नवी दिल्ली : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये करोना व्हायरसच्या ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BF.7 च्या चार रुग्णांची नोंद करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे सर्वजण अमेरिकेतून आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
अमेरिकेतून परतलेल्या चार लोकांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमुळे त्यांना करोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या सर्वांना ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BF.7 ची लागण झाली असल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले आहे. दरम्यान, चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. चार जणांपैकी तीन जण नादिया जिल्ह्यातील आहेत, तर एक व्यक्ती बिहारचा रहिवाशी आहे, परंतु सध्या तो कोलकात्यात राहतो.
गेल्या आठवड्यातही कोलकाता विमानतळावर कोविड-19 चाचणीत एका परदेशी नागरिकासह दोन जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते . त्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगनंतर पुष्टी केली की, त्यांना Omicron च्या BF.7 सब-व्हेरियंटचा संसर्ग झाला होता. चीनसह अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BF.7 ने खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर ठेवण्यात येत असून त्यांच्या करोना चाचण्या केल्या जात आहेत.
विमानतळावर स्क्रिनिंग आणि करोना चाचण्या केल्या जात आहेत. दरम्यान, अमेरिकेत शिकत असलेल्या उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका तरुणाला घरी परतल्यानंतर करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेतून आल्यानंतर त्याची प्रकृती ढासळू लागली, घसा खवखवणं, खोकला आणि ताप आला. त्यानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते, ज्याचा अहवाल मंगळवारी आला आणि त्याला करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. अधिकाऱ्याने सांगितले की, त्या विद्यार्थ्याला घरीच आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे.