संयुक्त राष्ट्र – ऐन सणासुदीच्या काळात करोनाच्या वाढत्या संसर्गाने पुन्हा चिंता वाढवली आहे. अनेक देशांमध्ये करोनाच्या तीन व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. एकीकडे दोन वर्षांनंतर करोना नियमांशिवाय दिवाळी साजरी करण्यासाठी लोकांमध्ये उत्साह आहे. मात्र दुसरीकडे करोनाच्या नवीन व्हेरियंटने डोकं वर काढले आहे. भारतासह चीन, इंग्लंडमध्ये नवीन व्हेरियंट वेगाने पसरताना दिसत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे तीन नवीन सबव्हेरियंट आढळून आले आहेत. बीएफ.7, एक्सबीबी आणि बीए.5.1.7 हे नवीन व्हेरियंट आढळले आहेत.
करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे हे तीन नव व्हेरियंट ओमायक्रॉन प्रमाणेच अधिक संसर्गजन्य असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. करोनाचे नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षाही अधिक संसर्गजन्य आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नवीन व्हेरियंटविरुद्ध लढण्यासाठी अनेक देशांमधील सरकारने आतापासूनच पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. तसेच अधिकाऱ्यांना करोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.
एक्सबीबी व्हेरियंट
नवीन करोनाचा एक्सबीबी व्हेरियंट ओमायक्रॉन विषाणूच्या बीए.2.75 आणि बीए.2.10 या म्यूटेशनचा मिळून तयार झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा प्रकार सर्वाधित संसर्गजन्य आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण लसीकरण झालेल्या देशामध्येही हा व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत आहे. करोना प्रतिबंधात्मक लसीमुळे शरीरात तयार झालेल्या प्रतिकारशक्तीलाही नवे व्हेरियंट चकवा देत आहेत. हा व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षाही अधिक संसर्गजन्य आहे. या विषाणूची लागण झालेल्यांमध्ये आतापर्यंत अंगदुखी हे लक्षण प्रामुख्याने आढळले आहे.
बीएफ.7 व्हेरियंट
बीएफ.7 हा प्रकार ओमायक्रॉन व्हेरियंटच्या बीए.5चा सबव्हेरियंट आहे. हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्तीलाही चकवा देत असल्याने अधिक संसर्गजन्य आहे. हा व्हेरियंटही अत्यंत संसर्गजन्य आणि अधिक धोकादायक आहे. हा व्हेरियंट सुरुवातीला चीनमध्ये आढळून आला. आता हा व्हेरियंट बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेनमार्क आणि इंग्लंडमध्येही वेगाने पसरताना दिसत आहे.
एक्सबीबी व्हेरियंट
ओमायक्रॉनच्या एक्सबीबी प्रकाराची लक्षणे सौम्य आहेत. परंतु या विषाणू अधिक संसर्गजन्य आहे, यामुळे करोनाची रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू शकते, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.