नवी दिल्ली : : जगाला पुन्हा एकदा करोनाने धडकी भरवण्यास सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. चीन नंतर आता देशात ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये करोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 सबव्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. BF.7 चे भारतात चार रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. करोनाचा वाढता धोका पाहता कर्नाटकमध्ये मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने एसी रूममध्ये आणि बंद ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे.
भारतातही ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटचे चार रुग्ण सापडल्याने भारत सरकार अलर्टवर आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर देशात आता नोझल करोना वॅक्सिन म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या करोना लसीला मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या समितीकडून नाकावाटे दिली जाणारी करोना लस वापरण्यास परवानगी दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काल संसदेत माहिती देताना,’आम्ही करोनाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. सध्या चीन आणि भारतामध्ये थेट विमानसेवा नाही पण लोक इतर मार्गाने भारतात येत आहेत. अशा परिस्थितीत नवा विषाणू भारतात प्रवेश करू नये आणि नागरिकांना प्रवासातही कोणताही अडथळा येणार नाही यावरही आम्ही भर देत आहोत, असे म्हटले होते.