टोकियो – टोकियो ऑलिम्पिक एक वर्षासाठी पुढे ढकलले गेले असले तरी या स्पर्धेचे आयोजन करोनामुळे संकटातच सापडले असल्याचा इशारा जपानच्या कोबे विद्यापीठातील विषाणू संसर्ग आजारावर संशोधन करत असलेल्या प्राध्यापक किंटोरो इवाटा यांनी दिला आहे.
करोनाचा धोका वाढल्याने येत्या 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणारी ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षाने पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. मात्र, तोपर्यंत करोनाचा धोका कायम राहणार असल्याची भीती इवाटा यांनी व्यक्त केली आहे. जरी जपानमध्ये करोनाचा धोका नियंत्रणात आला किंवा संपुष्टात आला तरीही अन्य देशांमध्ये त्यावेळी काय परिस्थिती राहील याचा आढावा घ्यावा लागणार आहे. तसेच या स्पर्धेसाठी जे देश आपल्या खेळाडूंना पाठवणार आहे त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न आहेच. स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी पाहण्यासाठी जगभरातून लाखो क्रीडा चाहते तसेच पर्यटक जपानमध्ये दाखल होतील त्यावेळी त्यांच्या जीवाला सर्वात जास्त महत्त्व आहे, त्यामुळे ही स्पर्धा पुढील वर्षी तरी बिनधोकपणे पार पडेल का अशी मला शंका आहे, असेही इवाटा यांनी सांगितले.
करोनावर नियंत्रण राखण्यात यश आले तरी खेळाडू व स्पर्धक यांना इथे सुरक्षीत वाटेल का याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रेक्षकांना मैदानात प्रवेश न देता रिकामी मैदाने ठेवून स्पर्धा खेळविणे हा एकच पर्याय सध्यातरी दिसत आहे. त्याची तयारी जपान ऑलिम्पिक संघटनेने केली तरी खेळाडू त्यासाठी तयार होतील का हा देखील प्रश्नच आहे.
या स्पर्धेसाठी जवळपास 11 हजार स्पर्धक तसेच जवळपास 15 हजार सपोर्ट स्टाफ येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लाखो क्रीडाप्रेमी व पर्यटक येण्याची आशा आहे. ही संख्या पाहता करोनाचा धोका पुन्हा निर्माण होणार नाही ना ही भीती कायम राहणार आहे. त्यामुळेच सध्यातरी केवळ कागदावर हे वेळापत्रक चांगले वाटत असले तरीही स्पर्धा आयोजन प्रत्यक्षात येईल का हीच शंका आहे, असेही इवाटा यांनी सांगितले.
स्पर्धेला वाढता विरोध..
ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाले तेव्हा जपानमध्ये प्रचंड उत्साह भरला होता. देशवासियांनी विविध शहरांत जल्लोष केला होता. आज मात्र परिस्थिती वेगळी दिसू लागली आहे. स्पर्धेला नागरिकांकडून विरोध होत असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येथील एका प्रसिद्ध व्यंगचित्रकाराने तर धावपटू शर्यत जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करत आहेत. तसेच एका स्पर्धकाच्या हातात क्रीडाज्योत आहे व तो धावत असल्याचे या चित्रात दिसत असून पुढे ऑलिम्पिक पदक मिळविलेला हाच स्पर्धक ड्रेनेजमध्ये म्हणजेच खड्ड्यात जात असल्याचे त्यात दाखविण्यात आले आहे. याचाच अर्थ स्पर्धा तर आयोजित होईल, स्पर्धक पदकेही मिळवतील मात्र, स्पर्धेच्या आयोजनावर झालेला व होणारा खर्च पाहता देश व देशवासी खड्यात जातील असा गर्भित इशाराही याद्वारे देण्यात आला आहे.