लाहोर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या करोना चाचणीचा निकाल निगेटीव्ह आला आहे. पाकिस्तानातील प्रसिद्ध एधी फाऊंडेशनचे प्रमुख अब्दुल सत्तार एधी यांच्या मुलाला फैसल एधी यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
फैसल एधी यांनी १५ एप्रिल रोजी इम्रान खान यांची भेट घेतली होती. इम्रान खान यांच्या भेटीनंतर घरी परतल्यावर त्यांच्यात करोनाची लक्षणं दिसून आली. फैसल यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर इम्रान खान यांच्या आरोग्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर इम्रान यांची करोना चाचणी झाली होती.
पाकिस्तानचे आरोग्य मंत्री जफर मिर्झा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. “प्रधानमंत्री इम्रान खान यांची आज सार्स-कोव-२ चाचणी करण्यात आली. (सार्स-कोव-२ विषाणूमुळे कोरनाची लागण होते.) मला हे सांगताना आनंद होत आहे की त्यांची चाचणी निगेटीव्ह आली आहे,” असे जफर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
करोना चाचणी निगेटीव्ह आली असली तरी इम्रान यांना काही दिवस क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फैसल यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांच्याही करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. पाकिस्तानमधील करोना रुग्णांची संख्या शुक्रवार (२४ एप्रिल २०२०) सकाळपर्यंत ११ हजारांहून अधिक होती. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये २३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.