कराड -कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर रमाकांत डाके यांनी पालिकेचा पदभार स्विकारला आहे. मात्र, पालिकेचे शासकीय निवासस्थान डांगे यांनी अद्यापही सोडलेले नाही. त्यामुळे डाके यांना टॉऊनहॉलच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची वेळ आली आहे.
मुख्याधिकारी डांगे पदावरून पायउतार झाले असलेतरी त्यांची कराडची ओढ काही केल्या संपेना. त्यामुळे नवीन मुख्याधिकाऱ्यांना कोणी घर देता का घर…! असेच म्हणण्याची वेळ आली आहे. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचा कराड नगरपालिकेतील कार्यकाल संपल्यानंतर करोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आणि त्यानंतर त्यांची तडखाफडकी उचलबांगडी करून त्यांच्या जागी सांगोला, मौदा तसेच कामटी नगरपालिकेत प्रभावी उपक्रमशील तसेच मुलभूत योजना राबवणारे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कराड नगरपालिकेत तत्कालीन मुख्याधिकारी डांगे, लोकनियुक्त नगराध्यक्षा, नगरसेवक, पदाधिकारी यांचे वाद-विवाद, श्रेयवाद तसेच मुख्याधिकाऱ्यांचे मनमानी “हम करे सो कायदा’ अशा पध्दतीच्या वर्तनाने त्यांना हटवण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. असे असलेतरी कराड शहराला स्वच्छ सर्व्हेक्षणात नावलौकीक मिळवून देण्यात डांगे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
यादरम्यान, शहराच्या मुलभूत कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. तर नगरसेवकात भांडणे लावण्यासह हुकूमशाही पध्दतीने काम मुख्याधिकारी डांगे करत असल्याचे त्यांच्यावर झालेले आरोप, कराड शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेतील दुजाभाव, शहराचे विद्रुपीकरण त्यांच्या या भुमिकेविरोधात रस्त्यावर उतरलेले नागरिक आणि त्यानंतर शहरातील विकासकामात झालेला “टेंडर झोल’ चांगलाच गाजला.
या दरम्यान, डांगे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर कराड पालिकेने चांगले काम केल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यांचा कार्यकाल संपला. मुख्याधिकारी डांगे यांची बदली होणार अशी चर्चा होती. मात्र, त्यांना एक वर्षाची मुदत वाढ मिळाली. दरम्यानच्या काळात झालेल्या राजकीय उलथापालथीत डांगे यांची उचलबांगडी झाली.
त्यांच्या जागी सांगोला, मौदा व कामटी नगरपालिकेत उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर आदर्श मुख्याधिकारी म्हणून काम करणारे रमाकांत डाके यांची कराड पालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्त झाले. त्यांनी दि. 24 जुलै 2020 रोजी कराड पालिकेचा पदभार स्विकारला. प्रत्यक्ष फिल्डवर उतरून आपल्या कामाला सुरूवात केली. करोनाबाधित रूग्णांना हॉस्पिटलमधील बेडची माहिती मिळावी म्हणून तातडी पालिकेत मदतकक्ष सुरू केला. निरंतर सर्व्हेक्षणाची संकल्पना मांडली आहे.
शहरातील वर्दळीच्या तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊन ते माहिती घेत आहेत. पालिका कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत पी.पी.ई. कीट घालून बाधितांशी संपर्क साधत आहेत. ज्याठिकाणी तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
मात्र, गेल्या अकरा दिवसांपासून ते येथील टाऊनहॉलच्या निवाऱ्याला आहेत. कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निवासस्थानात अजूनही तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचे वास्तव्य आहेत. वास्तविक पाहता त्यांच्या जागी दुसऱ्या मुख्याधिकारी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी होता होईल, तेवढ्या लवकर शासकीय निवासस्थान नवीन मुख्याधिकारी यांच्या ताब्यात देणे अपेक्षित आहे.
मात्र, गेल्या अकरा दिवसांपासून नवीन मुख्याधिकारी येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाच्या गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास आहेत. तेथूनच त्यांचे कामकाज सुरू असून त्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्यांना कोणी ‘घर देता का घर..!’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
डाकेंचे काम सकाळी 8 ला सुरू…
कराड नगरपालिकेत अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक यांच्या पालिकेत येण्याच्या वेळांवरून अनेकवेळा वादंग झाला आहे. पालिकेची मासिक सभा तर बहुतांशवेळा सायंकाळची असते. तर तत्कालीन मुख्याधिकारी पालिकेत बहुतांशवेळी न येता घरूनच काम बघत आणि आलेच तर ते सायंकाळी येतात, अशी पदाधिकाऱ्यांची ओरड होती. याउलट नवीन मुख्याधिकारी डाके यांचे काम असल्याचे दिसून येत आहे. ते सकाळी 8 वाजता पालिकेत हजर राहून कामाला सुरूवात करत असल्याचे दिसून येत आहे. याबरोबरच शहरातही ते फेरफटका मारताना दिसत आहेत.