नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटक्या जीन्सबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात एकाच खळबळ उडाली आहे. रावत यांच्या वक्तव्यावरुन सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच आता या वादात काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनींही उडी घेतली आहे. प्रियंका गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो पोस्ट केला आहे. मात्र हे करत असताना त्यांनी नेत्यांचे गुडघे दिसत आहेत असे म्हणत रावत यांच्यावर खोचक टीका केली आहे.
Oh my God!!! Their knees are showing 😱😱😱 #RippedJeansTwitter pic.twitter.com/wWqDuccZkq
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 18, 2021
“अरे देवा, त्यांचे गुडघे दिसत आहेत,” अशा कॅप्शनसहीत प्रियंका यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या फोटोंचं कोलाज आहे. या फोटोंमध्ये हे सर्व वरिष्ठ नेते संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसत असून त्यांनी संघाचा पोशाख म्हणजेच अर्ध्या बाह्यांचा पांढरा शर्ट आणि हाफ पॅण्ट घातलेली दिसत आहे. रावत यांनी गुडघे दिसणाऱ्या महिलांसंदर्भात वक्तव्य केल्याने त्याचा आधार घेत प्रियंका यांनी या वरिष्ठ नेत्यांचेही गुडघे दिसत होते असा टोला लगावला आहे.
दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले होते. “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,” असं रावत यांनी म्हटलं आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात हे वक्तव्य केले होते. मुलांवर होणाऱ्या संस्कारला पालक जबाबदार असतात, असेही ते म्हणाले.