सहारणपूर – कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज सहारणपूर लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीचे उमेदवार इम्रान मसूद यांच्यासाठी रोड शो केला. यावेळी भारतीय जनता पार्टीवर जोरदार प्रहार करताना त्या म्हणाल्या की आज जे सत्तेत बसले आहेत ते माता शक्तीचे आणि सत्त्याचे उपासक नाहीत तर सत्तेचे उपासक आहेत.
सत्ता प्राप्त करण्यासाठी ते कोणत्याही स्तरापर्यंत घसरू शकतात. ते सत्ता मिळवण्याकरता सरकारे पाडतील, आमदारांची खरेदी करतील, श्रीमंतांना या देशाची संपत्ती देऊन टाकतील. मात्र ही आपल्या देशाची परंपरा नाही.
सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या त्यांच्या रोड शो ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. चिलखाना रस्त्यावरील गोल कोंडा कोठीपासून रोड शोला सुरूवात झाली आणि रायवाला, जेबीएस इंटर कॉलेज, लाकुड बाजारमार्गे गुरूद्वारापर्यंत पोहोचून संपन्न झाला. प्रियंका गांधी यांनीही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळली आहे.
पक्षाने त्यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्यामुळे त्या उत्तर प्रदेशच्या बाहेरही कॉंग्रेस उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यांच्या भाषणांमध्ये त्यांनी बेरोजगारी आणि महागाई या मुदद्द्यांसोबतच महिलांना संधी देण्याचा मुद्दाही जोरकसपणे लावून धरला आहे.