नवी दिल्ली : देशात आता कुठे दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. रुग्णसंख्येचा वेगही कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी करोनासोबत बुरशीच्या आजाराने आता नागरिक हैराण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एका विचित्र घटनेमुळे डॉक्टरदेखील चक्रावून गेले आहेत.
लखनऊमध्ये एकाच रुग्णाला तीन प्रकारच्या बुरशीचा संसर्ग झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे. म्हणजेच व्हाइट फंगस, ब्लॅक फंगस आणि यल्लो फंगस अशा तिन्ही प्रकारच्या बुरशींचा एकाच वेळी संसर्ग झाल्याचा रुग्ण आढळून आला. दरम्यान, या रुग्णावर तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फैजाबाद येथे राहणाऱ्या सरस्वती यादव यांना महिन्याभरापूर्वी करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनी करोनावर मात केली आणि त्या घरी परतल्या. मात्र नंतर त्यांना चेहऱ्याजवळ वेदना होत असल्याने त्यांनी लखनऊमधील राजधानी रुग्णालयामध्ये धाव घेतली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर या महिलेला फंगसचा संसर्ग झाल्याचे समोर आले.
डॉक्टरांनी इतरही चाचण्या केल्या आणि त्यामध्ये समोर आलेल्या निकालांमधून या महिलेला एकाच वेळी तिन्ही प्रकारच्या बुरशीचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर डॉक्टरांनी गोळ्या औषधांच्या माध्यमातून उपचार सुरु केले. मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने शस्त्रक्रिया करुन चेहऱ्याचा काही भाग काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर या महिलेचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. करोनावर मात मिळवल्यानंतर एकाच रुग्णाला तिन्ही प्रकारच्या बुरशीचा संसर्ग होण्याचे हे पहिलच प्रकरण आहे. देशामध्ये अशाप्रकारे एकाच व्यक्तीला तिन्ही प्रकारच्या बुरशीची लागण झाल्याचं हे दुसरं प्रकरण आहे. यापूर्वी गाझियाबादमधील एका रुग्णाला तिन्ही प्रकारच्या बुरशीचा संसर्ग झाला होता. मात्र या रुग्णाला आधी करोना झालेला नव्हता.