तिने अनेक चित्रपटांत काम केले आहे, ते बालकलाकार म्हणून. त्यातला चाची 420 लक्षवेधी. सबकुछ कमल हासन असलेल्या या चित्रपटातील अन्य कलाकार फार चमकले नाहीत.
मात्र, त्या लहान मुलीने लक्ष वेधून घेतले. अर्थात दर्शिल (तारे जमीं पर) आणि बजरंगी भाईजानमधील हर्षालीसारखे ग्लॅमर तिला मिळाले नाही. दंगलने तिच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी दिली.
ती भारतात तर स्टार झालीच, मात्र चीनमध्येही हा चित्रपट तुफान चालल्यामुळे तिथेही फेमस झाली. तिचे नाव आहे फातिमा सना शेख.
फातिमा सध्या अन्य कलाकारांप्रमाणे घरीच आहे. शूटिंग बंद आहे. त्यामुळे कुठे जाणे नाही. त्यात कोणता प्रोजेक्टही तिच्या हातात नाही.
तिच्याच शब्दांत सांगायचे तर करोना कमी झाला अथवा कमी झाला की सगळ्यांना काम मिळेल. तसेच तिलाही काम मिळेल. मात्र आता तर ती बेरोजगार आहे. फातिमाने मध्यंतरी तीन चार चित्रपट केले.
त्यात आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ठग्ज ऑफ हिंदुस्तानही होता. या चित्रपटाकडून सगळ्यांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. पण बॉलीवूडच्या अलीकडच्या इतिहासातील हा सगळ्यात फ्लॉप चित्रपट ठरला.
बच्चन आणि आमीर त्याबाबत ब्र काढत नाहीत, तर इतर कलाकार बिचारे काय बोलणार? इतर चित्रपट तसे यथातथाच. त्यामुळे फातिमाला दंगलच्या यशानंतर तसे यश चाखायला मिळालेच नाही. आमीरचा तिच्यावर वरदहस्त असल्याची चर्चा असते.
मात्र, स्वत:च्याच कोषात जगणाऱ्या आमीरकडे पाहून त्यात कितपत तथ्य असेल हाही प्रश्न आहेच. शिवाय बॉलीवूडमध्ये गॉडफादर तुम्हाला काम मिळवून देतो, एन्ट्री मिळवून देतो.
पुढे सगळे प्रेक्षकांच्या हातात असते. त्यांनी ठरवले तर बस कंडक्टरलाही ते महानायक करतात किंवा महानायकांच्या मुलांनाही घरचा रस्ता दाखवतात. येथे आठवडाभरात स्टारडम मिळते आणि तेवढ्याच वेगात ते लयालाही जाते.