मुंबई : देशामध्ये करोनाच्या दुसरी लाट ओसरत असल्याचा दिलासा देशवासियांना मिळत असतानाच पुन्हा एकदा धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. देशात तिसऱ्या लाटेची सुरुवात ऑगस्ट महिन्यात म्हणजेच याच महिन्यामध्ये होऊ शकते असा दावा एका अहवालामधून समोर आला आहे.
ऑगस्ट महिन्यातच देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा फैलाव काही प्रमाणात सुरु होईल असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या लाटेमध्ये दिवसाला एक लाखांहून अधिक नवे करोना रुग्ण आढळून येतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तिसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती चिंताजनक झाल्यास दिवसाला रुग्णसंख्येचा आकडा दीड लाखांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हैदराबाद आणि कानपूरमधील भारतीय प्रौद्योगिक संस्था म्हणजेच आयआयटीमध्ये मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनिंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनानंतरच्या अहवालात हे दावे करण्यात आले आहेत.
ऑक्टोबर महिन्यामध्येच तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचा उच्चांक दिसून येईल अशी शक्यताही व्यक्त करण्यात आलीय. ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार विद्यासागर यांनी एका ईमेलच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. केरळ आणि महाराष्ट्रामधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक होऊ शकते असेही विद्यासागर म्हणाले असून ही या राज्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचे सांगण्यात येत आहे. करोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेइतकी घातक नसेल असेही सांगितले जात आहे.
याच वर्षी मे महिन्यात आयआयटी हैदराबादमधील प्राध्यापक विद्यासागर यांनी भारतामधील करोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता मॅथमॅटिकल मॉडलच्या आधारावर मे महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक पहायला मिळेल असे म्हटले होते. इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार विद्यासागर यांनी मे महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल आणि आकडेवारी पाहता जूनच्या शेवटापर्यंत दिवसाला २० हजार करोना रुग्ण आढळून येतील असेही विद्यासागर त्यावेळेस म्हणाले होते. मात्र विद्यासागर यांच्या टीमचा अंदाज चुकला होता.
यासंदर्भात बोलताना त्यांनी चुकीच्या मापन पद्धतीमुळे अंदाज चुकल्याचे सांगितले होते. करोना प्रादुर्भावाच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीनुसार, करोना रुग्णसंख्येचा उच्चांक ३ ते ५ मे दरम्यान असेल असे सांगितले होते. तर इंग्रजी वर्तमानपत्राला त्यांनी ७ मेच्या आसपास करोना रुग्णसंख्येचा उच्चांक काढला जाईल असे म्हटलेले.