पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाबाबत विद्यार्थी, पालक यांना उत्सुकता लागलेली आहे. दरम्यान, निकालाचे काम अंतिम टप्प्यात असून अद्यापही तारीख ठरली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. करोनामुळे परीक्षा रद्द झाली. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याचे निकषही निश्चित झाले. दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के, बारावीसाठी 40 टक्के याप्रमाणे 100 टक्के नुसार मूल्यमापन करण्याचे सूत्र ठरले. निकाल तयार करून गुण राज्य मंडळाच्या संगणक प्रणालीवर नोंदविण्यासाठीचे वेळापत्रकही जाहीर झाले होते. पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह इतर विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे निकालाचे गुण नोंदविण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली होती. आता विभागीय मंडळ व राज्य मंडळाच्या स्तरावर निकाल तपासणीचे काम सुरू असून ते शेवटच्या टप्प्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपूर्वी बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सीबीएसई, सीआयसीएसई बोर्डांच्या बारावीचे निकाल जाहीर झाले. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल मात्र अद्यापही जाहीर झालेला नाही. आठवडाभरात तो होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाचे काम पूर्ण झाल्यानंतर निकालाबाबतची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी निकालाच्या इतर कोणत्याही तारखांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. – दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ