लंडन : जुन्या घरातून कधी कोणाच्या हाती कोणता खजिना लागेल सांगता येत नाही याचे ताजे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. एका जुन्या घराच्या लाकडी कपाटात सापडलेल्या जुन्या वाळक्या लिंबाला लिलावामध्ये तब्बल 1400 पौंड रक्कम मिळाली आहे.
लंडन परिसरातील एका जुन्या घराची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर संबंधितांनी या घरातील वस्तूंची पाहणी सुरू केली होती. तेव्हा एका 19 व्या शतकातील लाकडी कपाटाच्या एका ड्रॉवरमध्ये हे लिंबू सापडले. हे लिंबू जरी वाळले असले तरी त्याचा आकार व्यवस्थित होता.
ज्यांना हे घर विकायचे होते त्यांना ही कुठलीतरी एखादी पुरातन वस्तू असे वाटल्याने त्यांनी लिलाव करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला. लिलाव कंपनीने ते जुने लिंबू असल्याचे ओळखले आणि त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. या जुन्या वाळक्या लिंबाला तब्बल 1400 पौंडची रक्कम मिळाली. महत्त्वाचे म्हणजे या वाळक्या लिंबाच्या सालीवर काही मजकूर कोरला होता. त्यामध्ये चार नोव्हेंबर 1739 अशी तारीख होती आणि लू पासीनी याने इ बेक्स्टर हिला हे लिंबू भेट देत असल्याचा उल्लेख होता.
तज्ज्ञांच्या मते ही एक प्रकारची प्रेमाची भेट होती या जुन्या घराच्या मालकांनी केवळ गंमत म्हणून या लिंबाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता आणि या लिंबाला फार तर 35 ते 40 पौंड मिळतील असे त्यांना वाटले होते प्रत्यक्षात लीलावात हे लिंबू तब्बल चौदाशे पौंडला विकले गेले.