कराड -करोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करून कराड पालिकेत वाढदिवस साजरा झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल. लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील वाळू चोरी प्रकरणात दोषी तलाठ्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
येथील विश्रामगृहात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते उपस्थित होत्या. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवून पालिकेत मुख्यधिकारी यशवंत डांगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रकरणी कोणती करावाई झाली, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, करोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगसह सर्व आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे. कराड पालिकेत वाढदिवस साजरा झाल्याच्या तक्रारींची चौकशी करून कारवाई केली जाईल. लॉकडाऊनमध्ये वाळू, मूरूम या गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर चोरी झाली.
यात महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. चोरट्या दारू विक्रीबाबतही तक्रारी आल्याने दारू विक्रेत्यांच्या स्टॉकची तपासणी सुरू आहे. दोषींवर दंडात्मक व परवाने रद्द करण्यापर्यंत कारवाई केली जाईल, असे सिंह यांनी सांगितले.