ओतूर -चिल्हेवाडी (ता. जुन्नर) येथील धरण प्रकल्पाचा अंडरग्राउंड टनलचा (बंदिस्त पाइपलाइन कालवा) पहिला टप्पा तब्बल वीस वर्षांनी पूर्णत्वास जात आहे. डोमेवाडी येथे मंगळवारी (दि. 23) माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. हा टनल चिल्हेवाडी पाचघर ते बेल्हे रानमळापर्यंत सुमारे 39 किलोमीटर अंडर टनल करण्यात येत आहे. यापैकी 12.5 किमीचा पहिला टप्पा पूर्ण झालेल्या पाइपलाइनचे जलपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे पाच गावांना सध्या लाभ होणार आहे.
यावेळी आमदार अतुल बेनके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक परशुराम कांबळे, कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस. जे. माने, सहायक अभियंता श्रेणी 1 एम. के. शिंदे, सहायक अभियंता श्रेणी 2 चे डी. एम. नाईकनवरे, कनिष्ठ अभियंता सी. जी. वैद्य, इंडियन ह्युम पाईप इंडिया लि. कंपनी मुंबईचे असिस्टंट मॅनेजर एस. वाय. शेख, ओतूर, डोमेवाडी, रोहोकडी, उंब्रज, खामुंडी, पाचघर आदी गावातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी आमदार दांगट म्हणाले की, हा प्रकल्प सुरूवातीला 192 कोटी रुपयांचा होता. संबंधित कंपनीला उक्ते काम देण्यात आले होते. कामाला विलंब झाल्याने या प्रकल्पाची किंमत वाढली आहे. आमदार अतुल बेनके हे निधी वाढवून घेतील, अशी खात्री आहे. जुन्नरचा पाणी प्रश्न मार्गी लावतील. बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी मार्गदर्शन केले.
चिल्हेवाडी धरण 2000 मध्ये पूर्ण झाले आहे. 400 मीटर लांब व 63 मीटर उंचीचे 0.89 टीएमसी क्षमतेचे हे धरण आहे. याकरिता त्यावेळी 194 कोटी रुपयांचा निधी धरण प्रकल्प व कालवा यासह मंजूर झाला होता. मात्र, 2016 मध्ये धरण पूर्ण होऊन इतर कामे झाली आहेत. त्यानंतर तांत्रिक अडचणी, जमीन हस्तांतर आदी कारणांमुळे जलवाहिनीचे काम रखडले होते. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. 12 किलोमीटर बंदिस्त जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा फायदा चिल्हेवाडी, पाचघर, आंबेगव्हाण, रोहकडी, अहिनवेवाडी, ओतूर आदी गावांना होणार आहे.
-एम. के. शिंदे,
सहायक अभियंता श्रेणी 1 शेतकरीहिताचे निर्णय घेऊन जलवाहिनीच्या कामाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे. माजी आमदार बाळासाहेब दांगट व वल्लभ बेनके यांनी प्रकल्प उभारणीसाठी मेहनत घेतली आहे. दोघांचा राजकीय संघर्ष हा विचारांचा आणि तालुक्याच्या विकासाचा होता. पाण्याचा हक्क सर्वांचा आहे. या चिल्हेवाडी प्रकल्पामुळे तालुक्यातील 6 हजार 372 हेक्टर इतके जमीन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. संपूर्ण तालुका टॅंकरमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.
– अतुल बेनके, आमदार जुन्नर.