मंचर -घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे एका ग्राहकाला फ्लॅट देण्याचे कबूल करुन 9 लाख 70 हजार रुपये घेऊन प्रत्यक्ष फ्लॅटची विक्री दुसऱ्याच ग्राहकाला करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिल्डर जयंतीलाल नानाजी पटेल (रा. घोडेगाव) यांच्याविरोधात ज्ञानेश्वर काथेर यांनी फिर्याद दिली आहे.
घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयंतीलाल नानाजी पटेल यांनी घोडेगाव येथील ओंकार प्लाझा या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. 9 हा ज्ञानेश्वर तुकाराम काथेर (वय 70, रा. आमोंडी, काथेरवाडी) यांना विकत देण्याचे कबूल केले. त्यासाठी काथेर यांच्याकडून एकूण 9 लाख 70 हजार रुपये घेऊन साठेखत करून दिले;
परंतु हा फ्लॅट ज्ञानेश्वर काथेर यांना न विकता, तसेच घेतलेले पैसे परत न देता सुदाम सावित्रा येवले (रा. गंगापुर बुद्रुक) यांना विकला असून, पटेल कोठेतरी निघून गेले आहेत. ज्ञानेश्वर काथेर यांची फ्लॅटविक्रीत फसवणूक झाली असून, जयंतीलाल नानाजी पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान एस. एम. लांडे करीत आहेत.