मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जांभोरी येथील मधुकर हिले यांचा मुलगा असल्याचे भासविण्यासाठी बनावट आधारकार्ड बनविल्याप्रकरणी सत्यनारायण हरिलाल गुप्ता (रा. मळीयान, जोधपूर) उत्तरप्रदेश) याच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.
घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांपूर्वी सत्यनारायण गुप्ता (मूळ रा. मळीयान, जोधपूर उत्तरप्रदेश) ही व्यक्ती भीमाशंकर येथे आली असता त्याची जांभोरी येथील सखुबाई मधुकर हिले यांचा मुलगा सुभाष हिले यांच्याबरोबर ओळख झाली. त्यावेळी सत्यनारायण गुप्ता याने मी एकटाच असून, मला कोणीही कुटुंबीय नाही, नातेवाईक नाही असे सांगून सखुबाई हिले यांच्याकडे आसरा मागितला. त्याची दया येऊन सखुबाई हिले यांनी त्यास आसरा दिला.
पाच-सात वर्षानंतर दुसरीकडे जातो, असे सांगून सुपे सातकरवाडी (ता. खेड) येथे राईसमिल चालवू लागला. त्याच्या राईसमिलवर कामास असलेली जांभोरी गावातील व्यक्ती भिकाजी तुळशिराम केंगले यांच्याकडून समजले की सत्यनारायण गुप्ता याचे आधारकार्ड आले असून, त्यावर त्याचा फोटो आहे आणि या आधार कार्डवर त्याचे नाव सत्यनारायण मधुकर हिले (रा.आंबोली, सुपे सातकरवाडी, ता. खेड) अशी नोंद आहे.
भिकाजी केंगले याने या आधारकार्डचा फोटो सुभाष हिले यांच्या मोबाइलवर पाठविला. सत्यनारायण गुप्ता यान सखुबाई हिले यांच्या घरी राहण्यास असताना पती मधुकर हिले यांच्या ओळखीचे, वास्तव्याचे कागदपत्र किंवा त्याच्या प्रती मिळवून त्या कागदपत्रांचा गैरवापर करून तो मधुकर हिले यांचा मुलगा असल्याचे भासविण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून त्याचा वापर केला आहे.
सत्यनारायण गुप्ता यांच्यावर घोडेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखुबाई हिले यांनी याबाबत फिर्याद दिली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव करीत आहेत.