पिंपरी – इंधन दरात होत असलेली वाढ, जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी सरकारने तयार केलेल स्क्रॅप धोरण, तसेच नव्या वाहनविक्रीत झालेली घट यामुळे जुन्या वाहनांचा बाजार मात्र थंडावला आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून रशिया-युक्रेन युद्धानंतर इंधनाच्या दरात आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सीएनजी किंवा इलक्ट्रिक वाहने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. करोनाची साथ आटाक्यात आल्यावर भारतातील अनेक ऑटोमोबाइल कंपन्यांनी आपल्या नवीन गाड्या बाजारात लॉंच केल्या आहेत. मात्र, या गाड्यांना 3 महिने, 6 महिने ते अगदी 1 वर्षापर्यंत वेटिंग आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना गाडी बुक केल्यानंतरही प्रतीक्षा करावी लागत आहे.
जास्त वर्षे जुन्या गाडीची नोंदणी होत नसल्याने या गाड्यांकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. तसेच जुन्या वाहनांमध्ये सीएनजी आणि इलक्ट्रिकचा पर्याय उपलब्ध होत नसल्याने जुन्या मोटारींची विक्री घटली आहे. अगदी एक लाखात देखील या गाड्या विकल्या जात नसल्याने सेकंडहॅंड गाड्यांचे व्यापारी चिंतेत आहेत. प्रत्येकजण नवी गाडी घेण्यास इच्छुक आहे. नव्या गाडीसाठी देखील कित्येक महिने प्रतीक्षा करावी लागत आहे.
2010 पूर्वीच्या गाड्यांची इंजिनची क्षमता खालावलेली असते. त्यामुळे अशा गाड्यांना दर महिन्याला देखभाल खर्च करावा लागतो. या गाड्यांच्या रंग, टायरपासून ते इंटेरियर अशा सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे 2010 पूर्वीच्या अत्यंत कमी गाड्या सीएनजीवर चालणाऱ्या असतात.
त्यामुळे 2010 मधील गाड्यांना मागणी नाही. विविध कंपन्यांनी ग्राहकांसाठी फायनान्स ऑफर जाहीर केल्यामुळे अगदी कमी डाऊन पेमेंटमध्ये देखील गाडी खरेदी करता येते. सेकंडहॅंड गाड्या खरेदी करण्यासाठी अशा वाहनांचे विक्रेते चांगल्या ऑफर्स ग्राहकांना देतात. 2015 च्या पुढील गाड्यांची स्थिती चांगली असते. या गाड्यांना जास्तीत जास्त प्रमाणात कंपनी फिटिंग सीएनजी देखील उपलब्ध असते. त्याप्रमाणे या गाड्यांमध्ये अत्याधुनिक फीचर्स असतात व इन्शुरन्स व पीयूसी देखील असते. त्यामुळे 2015 च्या पुढील गाड्यांना बाजारात जास्त मागणी आहे.
सरकारने स्क्रॅप धोरण जाहीर केल्यानंतर जुन्या गाड्यांच्या किमतीत कमालीची घसरण झाली आहे. पूर्वी तीन ते चार लाखांत उपलब्ध असणाऱ्या गाड्या आता दोन ते अडीच लाखात विकण्यास व्यापारी तयार होत आहेत. गाडीला सीएनजी पर्याय नसल्यास ती गाडी एक ते दीड लाख या किमतीत विकली जात आहे. तसेच 2008-10 दरम्यान उपलब्ध असणारे मॉडेल अगदी 50 हजारात देखील उपलब्ध आहे.