पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीमध्ये आपले राजकीय भवितव्य अजमावण्यासाठी अनेक इच्छुक सरसावले आहे. विविध तंत्रज्ञानाचा वापर करत इच्छुकांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. अनेकांनी आपले वॉर रुम सज्ज केले असून भर उन्हाळ्यात निवडणुकीच्या प्रचाराचा पारा चढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
निवडणूक म्हटले की पूर्वी दारोदार फिरून नागरिकांशी संपर्क वाढवला जात होता. अनेक ठिकाणी पडद्यावर रंगवून बॅनर तयार केले जात होते. तर साध्या कागदावर परिचय पत्र छापून ते वाटण्यासाठी मोठी कार्यकर्त्यांची फौज कामाला लावली जात होती. मात्र जसजसे तंत्रज्ञान आले तसा प्रचाराचा फंडाही बदलला आहे. त्यानुसार शहरामध्ये इच्छुकांनी स्मार्ट प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.
अनेक नगरसेवकांसह इच्छुकांनी देखील आपल्या प्रभागातील प्रत्येक कुटुंबातील किमान एकाचा तरी मोबाइल नंबर मिळवून त्यावर शुभेच्छा संदेश पाठविण्यास सुरुवात केली आहे. बहुतेकांचे प्रयत्न तर आपल्या प्रभागातील प्रत्येक मतदाराचा मोबाइल नंबर मिळवून त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा सुरू असल्याचे दिसून येत आहे. यासाठी सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या तरुणांच्या टीम राजकीय मंडळींनी कामाला लावल्या आहेत.
सध्या समाजमाध्यमांवर तरुणांसहित ज्येष्ठ नागरिक देखील सक्रिय असतात. त्यासाठी निवडणुकीसाठी समाजमाध्यमावर प्रचार करण्यास सर्वच इच्छुकांसह विद्यमानांनी प्राधान्य दिले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यावर इच्छुकांनी लक्ष्य 2022 ट्रेंड सुरू केला आहे. आपल्या प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हॉटसअपचे ग्रुप केले आहेत. त्यावर दररोज संदेशाची सरबत्ती केली जात आहे. तर अनेक इच्छुकांनी त्या ग्रुपच्या माध्यमातून प्रभागातील समस्या समोर आणण्यास सुरूवात केली आहे.
लग्न, वाढदिवस, घरातील इतर शुभकार्यासाठी त्या घरातील व्यक्तींपूर्वीच इच्छुक व उमेदवाराच्या समाजमाध्यमावर पत्रिका प्रसिद्ध केल्या जातात. तर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती असते. अनेकवेळा यानिमित्ताने राजकीय विरोधक देखील एकाच व्यासपीठावर आमने-सामने येतात.
प्रभागात केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी उमेदवारांचे छोटे-छोटे व्हिडिओ तयार केले जातात. तर इन्स्टाग्रामच्या रीलवर अक्षरशः इच्छुकांच्या व्हिडिओने धूमाकूळ घातला आहे. तसेच प्रभागातील कामांचा आलेख मांडण्यासाठी जनसंपर्क कार्यालय व प्रमुख चौकांमध्ये मोठे एलसीडी लावून त्यावर व्हिडिओ लावले जातात. त्याचप्रमाणे प्रभागामध्ये वाहनांवर एलसीडी स्क्रीन लावून वाहने फिरवली जात आहे. प्रत्येक सण, दिनविशेष बाबत समाजमाध्यमांवर शुभेच्छा देणारे ग्राफीक्स अपलोड करून नागरिकांना आकर्षित केले जात आहे.
वाढदिवस साजरा करण्यासाठी इच्छुक विद्यमान घरोघरी
प्रभागातील नागरिकांची सर्व माहिती इच्छुक व विद्यमानांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये असते. त्यावरून प्रत्येक नागरिकाच्या वाढदिवसाची माहिती काढली जाते. आपल्या मतदाराचा वाढदिवस असल्याने इच्छुकांच्या स्टेटसला एकाच दिवशी पाच-दहा नागरिकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार संदेश असतात. तर अनेक इच्छुक, विद्यमान घरोघरी जाऊन वाढदिवस साजरे करतात.