पाच जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी – टिकटॉकवर महिलेने अपलोड केलेल्या व्हिडिओवर अश्लील कमेंट केली. तसेच मुलीच्या टिकटॉक व्हिडिओला अश्लील गाणे लावणाऱ्या पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगवी येथे घडली.
अक्षय साहेबराव म्हसे (रा. जुनी सांगवी), गोविंद पाटील (रा. हिंगोली), सत्यवान झांजे (रा. कात्रज, पुणे), रोहण कणसे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) आणि सूरज जाधव (रा. रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत 40 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 1 जुलैपासून वेळोवेळी महिलेच्या टिकटॉक व व्हॉटस्ऍपवर घडली. फिर्यादी महिलेने टिकटॉकवर अपलोड केलेल्या व्हिडिओवर आरोपी अक्षय याने अश्लील कमेंट केली. तसेच व्हॉट्सऍपवर शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली. अक्षय याने आपल्या ओळखीच्या इतर आरोपींना पीडित महिलेचा मोबाइल क्रमांक देऊन अश्लील मेसेज व धमकी देण्यास सांगितले. अक्षय याने फिर्यादी यांच्या मुलीच्या नावे अकाऊंट तयार करून त्यात फिर्यादीच्या मुलीने टिकटॉकवर अपलोड केलेल्या व्हिडिओला एडिट करीत अश्लील गाणे टाकले. तसेच तो व्हिडिओ “टिकटॉक’वर अपलोड केला.
वाकड येथे राहणाऱ्या एका 29 वर्षीय महिलेने अक्षय याच्या व्हिडिओवर कमेंट केली होती. त्यावर अक्षय याने तुझा पत्ता सापडला आहे. लवकरच माझी टीम घेऊन तुझ्या घरी येणार असल्याची धमकी दिली. तसेच आरोपी गोविंद पाटील याने आपल्या टिकटॉक अकाऊंटवरून फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सहाय्यक निरीक्षक संजय निकुंभ याबाबत अधिक तपास करीत आहेत.