भोर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात फक्त भोर तालुक्यात ग्रामदूत ही संकल्पना राबवली आहे. या संकल्पनेंतर्गत गावातील लोकांना जी वैद्यकीय किंवा जीवनावश्यक वस्तूंची गरज लागेल, त्या वस्तू तो ग्रामदूत त्याच किंमतीत लोकांना घरपोच देत आहे. अशी संकल्पना राबवणारा भोर हा जिल्ह्यातील एकमेव तालुका ठरला असल्याचे खासदार सुळे यांनी निदर्शनास आणून देत उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनाला सहकार्य केले आणि गरजूंना मदत केली तर लवकरात लवकर या संकटावर मात करू, असा विश्वास यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला, अशी माहिती भोर तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष गणेश खुटवड यांनी दिली.
करोनाच्या अनुषंगाने बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यातील युवक राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष व विद्यार्थी राष्ट्रवादीच्या अध्यक्षांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मदत कार्याविषयी आढावा बैठक आयोजित केली होती, त्यावेळी त्यांनी वरील गौरवोद्गार काढले. करोनामुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे. नवीन शासकीय योजना प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी ग्रामदूत म्हणून प्रशासनासोबत काम करीत आहेत. पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारकांना अत्यंत कमी किंमतीत धान्य पुरवठा सुरूच आहे.
ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांनाही धान्य व जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे आदेश रेशन दुकानदारांना दिले आहेत. शरद भोजन योजने अंतर्गत जिल्हा परिषदेकडून हजारो लोकांना मोफत जेवण दिले जात आहे, त्याची माहिती तालुका पंचायतीमध्ये उपलब्ध आहे. काही ठिकाणी जर अजून मदतकार्य व शासकीय योजना पोहोचल्या नसतील तर त्या ठिकाणी मदतकार्य पोचवण्यासाठी सर्वांना सूचना यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या आहेत.
भोर तालुक्यात आत्तापर्यंत 2 करोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यांना औंध येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. त्या संबंधित गावामध्ये प्रशासनाने पूर्णपणे आपली यंत्रणा राबवून 80 पेक्षा अधिक नागरिकांना होमक्वारंटाइन केले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती या वेळी खासदार सुळे यांना देण्यात आली.