पुणे – साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण असणारी अक्षयतृतीया यंदा घरीच साजरी झाली. शुभ मुहूर्त साधून रविवारी घरोघरी पूजा करून, नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी करोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना नागरिकांनी केली. मात्र, यंदा खरेदीशिवाय अक्षयतृतीया पार पडली.
अक्षयतृतीयेला नागरिक सोने-चांदी, वाहने आदींची खरेदी करण्यात येते; परंतु यंदा संपूर्ण बाजारपेठा बंद असल्याने, ग्राहकांना कोणतीही खरेदी करता आली नाही. दरवर्षी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये अक्षयतृतीयेच्या दिवशी हजारो वाहनांची नोंदणी होते. पण, यंदा शोरूमच बंद असल्याने वाहन नोंदणी झाली नाही. यासह यावर्षी ग्राहकांना दुकानांतून सोने खरेदी करता येणे शक्य नसल्याने, व्यावसायिकांनी ऑनलाइनचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. याद्वारे देखील काहींनी मुहूर्त साधून ऑनलाइन सोने बुक केले.
दरवर्षी शहरातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची सजावट करण्यात येते. आंब्यांची आरास करण्यात येते. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. मात्र यंदा मंदिरांमध्ये छोट्या स्वरुपात विधीवत पूजा करण्यात झाली. विविध मंदिरांतील सजावट रद्द करून, गरजूंना मदत करण्यात आली.
अक्षयतृतीयेला आमरस-पुरीचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र यंदा अनेक घरांमध्ये अन्य पक्वानांनी याची जागा घेतली.