भोर,(प्रतिनिधी) – रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाईड आणि रोटरी क्लब ऑफ पुणे युवा यांच्या वतीने राबविण्लेयात आलेल्ल्या या पर्यावरणपूरक सोलर प्रकल्पामुळे हातवे बु (ता.भोर) येथील ५० कुटुंबांना पुढील २५ वर्षांसाठी मोफत वीज पुरवठा होणार आहे.
रोटरी ब्लबच्या वतीने अमेरिकेत मुख्य कार्यालय असलेल्या इमर्सन कंपनीने या प्रकल्पाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. रोटरीच्या सदस्या डॉ. मीनाक्षी बोराटे यांच्या पुढाकाराने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे लोकार्पण शनिवारी (दि.२०) करण्यात आले. इमर्सन कंपनीचे व्हा. प्रेसिडेंट अजय सावरगावकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करून प्रकल्प ग्रामस्थांकडे हस्तांतरित करण्यात आला.
यावेळी रोटरीचे माजी डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. माधव बोराटे, शीतल शहा, रोटरी क्लब ऑफ पुणे युवाचे अध्यक्ष निनाद जोग, सेक्रेटरी अर्चिता मडके, धनश्री जोग, रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाईटचे अध्यक्ष अजय पवार, अदिती रहाणे, महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रसाद कुलकर्णी, रवी इलेक्ट्रीकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्सचे तुलशीदास वाबळे, अमर वाबळे, अभय बनसोड, अॅड. मुर्तझा जीवाणजी, विकास जाधव आदींसह रोटरी क्लबचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पर्यावरणपूरक सोलर प्रोजेक्ट अंतर्गत हातवे बु येथील सुमारे २४० कुटुंबांपैकी आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या ५० कुटुंबांची निवड करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांच्या घराच्या छतावर दोन सोलर पॅनेल बसविण्यात आले असून निर्माण होणारी वीज नेट मीटरव्दारे महावितरणला देण्यात आली. नेटमीटर आणि महावितरणच्या विशेष मीटरमार्फत वीज संबंधित लाभार्थ्यांच्या घरात देण्यात आली.
तयार झालेल्या सोलरच्या विजेचे आणि वापरलेल्या विजेची आकडेवारी महावितरणकडून नोंदविण्यात येत आहे. दररोज एक केव्हीए एवढी वीजनिर्मित होत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थी शेतकऱ्याला सध्या येत असलेले ६०० ते ७०० रुपयांचे विजेचे बील हे झिरो येणार आहे.
पुढील २५ वर्षांपर्यंत संबंधित प्रकल्पाची देखभालही करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांला वीजबील येणार नाही. पुढील २५ वर्षांत सर्वच्या सर्व ५० जणांचा विजेचा खर्च वाचणार आहे. याशिवाय सौरवीजेमुळे कार्बनचे उत्सर्जन कमी प्रमाणात होत असल्यामुळे पर्यावरणाचीही हानी होणार नाही.
‘पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी रोटरी क्लबने हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे. महावितरणच्या परवानगीने आणि इमर्सन कंपनीच्या साहाय्याने आम्ही हा प्रकल्प यशस्वी केला आहे. हातवे बुद्रूकमधील ५० कुटुंबांचा विजेचा प्रश्न सोडविल्याचा आम्हाला आनंद आहे’.- डॉ. मीनाक्षी बोराटे, संकल्पक पर्यावरणपूरक सोलर प्रोजेक्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे युवा.