पाच दिवसांत 91 अर्जांची विक्री
भोसरी विधानसभा मतदार संघासाठी आज (मंगळवार) दिवसभरात 20 जणांनी 40 अर्ज नेले. यामध्ये आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी व भावासह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांचाही समावेश आहे. समाजवादी पक्षाकडून वहिदा शेख यांचा पहिला अर्ज भोसरी मतदार संघात दाखल झाला आहे.
अर्ज वाटपाला सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत एकूण 41 जणांनी 91 अर्ज नेले आहेत. आमदार लांडगे यांच्या पत्नी पूजा व बंधू कामगार नेते सचिन लांडगे यांनीही अर्ज नेला. युतीच्या जागा वाटपात भोसरी विधानसभा मतदार संघ शिवसेनेला सोडण्याची मागणी शिवसैनिकांकडून होत होती. मात्र, भाजपला हा मतदार संघ गेल्याचे स्पष्ट झाले असून युतीचे उमेदवार म्हणून आमदार लांडगे यांना भोसरीच्या निवडणूक आखाड्यात उतरविण्यात येणार आहे.
शिवसेनेकडून इच्छुक असलेले इरफान सय्यद यांनी अपक्ष तर माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज नेला. तर या मतदार संघातील पहिला उमेदवारी अर्ज आज दाखल झाला. समाजवादी पक्षाकडून वहिदा शेख यांनी अर्ज दाखल केला आहे.