नगर -कर्नाटक सरकारने 5 हजार रुपयांची मदत देण्याचे घोषित केलेले आहे. महाराष्ट्रातही सलून व्यवसायिकास महिना 10 हजार रुपये आर्थिक सहाय्य तसेच लाईटबील माफ करावे, प्रत्येक व्यवसायिकाचा आरोग्य विमा करावा, अशी मागणी नाभिक महामंडळाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
आमच्या या मागणीची दखल न घेतल्यास नाभिक समाज येणाऱ्या काळात आपल्या हक्कासाठी न्यायिक मार्गाने या घटनेचा तीव्र निषेध करेल. शासनाने 31 मे पासून महाराष्ट्रातील सलून व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने सलून व्यवसाय सुरु ठेवण्याची मागणी केली आहे. यावेळी राज्य नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, सुनिल वाघमारे, विकास मदने, सुनिल खंडागळे, किशोर मोरे, जनार्दन वाघ, चंद्रकांत बिडवे, शिवाजी दळवी, सुनिल वाघमारे, सुरेश राऊत यांच्या सह्या आहेत.