कोथरुड : कोथरुड मतदार संघात भाजप कडून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी बंडाचे निशाण फडकले होते. पण आज चंद्रकांत पाटील यांच्या अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅली तील रथामध्ये पाटील यांच्या समवेत मोकाटे दिसल्याने सर्वांनच आश्चर्याचा धक्का बसला.
त्यामुळे बंडाचे निशाण थंड झाल्याची चर्चा सुरू झाली. आज कोथरूड मधून शिवाजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाटील यांची अर्ज भरण्याचे रॅली निघणार होती. त्याअगोदर पाटील यांनी मोकाटे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मोकाटे यांनी आपण युतीचेच काम करणार असल्याचे पाटील यांना सांगितले.
या चर्चेनंतर मोकाटे हे पाटील यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले. या चर्चेवेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची मध्यस्थी कामी आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या मोकाटे यांचे बंड थोपवण्यात पाटलांना यश आले असे म्हणता येईल.
मोकाटे म्हणाले पाटील माझ्या घरी चहापानासाठी आले होते. मी मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याची त्यांना विनंती केली. कोथरूडमधील मतदार आणि विरोधी पक्षांचा मला निवडणूक लढविण्यासाठी आग्रह होता. त्यांचे मी आभार मानतो. मी सेनेच्या विचारांच्या विरोधात जाऊ शकत नाही. त्यामुळे मी मनापासून महायुतीचे काम करणार आहे.