मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची माहिती
चंदिगड: आसामपाठोपाठ आता हरियाणामध्येही राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात “एनआरसी’ची अंमलबजावणी केली जाणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनहरलाल खट्टर यांनी आज त्याबाबतचे सूतोवाच केले. मात्र “एनआरसी’ची अंमलबजावणी कधी आणि कशी केली जाणार याबाबतचा तपशील त्यांनी सांगितला नाही.
हरियाणामध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मानस असलेल्या खट्टर यांनी रविवारी राज्यातील मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एच.डी. भल्ला आणि नौदलाचे माजी प्रमुख ऍडमिरल सुनिल लांबा यांच्यासह काही मान्यवर व्यक्तींशी संवाद केला. भाजपच्या देशव्यापी जनसंपर्क मोहिमेअंतर्गत त्यांनी हा संवाद साधला.
न्या. भल्ला यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी “एनआरसी’च्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे सांगितले. हरियाणामध्ये विधी आयोग असावा, असे ऍड. भल्ला यांनी सुचवले आहे आणि त्याचाही सरकार विचार करणार असल्याचे खट्टर यांनी सांगितले.
हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. हरियाणातील नागरिकांसाठी लवस्करछ् कौटुंबिक ओळखपत्र राबवण्यात येईल असेही खट्टर यांनी सांगितले.