राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वे तयार
रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत उद्धव ठाकरे यांची चर्चा
पुणे/मुंबई – राज्यातील रेस्टॉरंट ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी रेस्टॉरंट सुरु करण्याची कार्यपद्धती आधी ठरवली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, करोनाचे संकट असताना या काळात हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक सरकारसोबत असल्याचे समाधान आहे. करोनावर अजूनही लस वा औषधी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे करोनासोबत जगताना काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये करोनानंतरची लक्षणंही दिसून येत असून, आर्थिक बाबींसाठी सरकारने काही पावले टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते. त्यानंतर आता एकपाठोपाठ सुरू करत आहोत.
राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. या विषाणूने बाधित 80 टक्के लोकांना लक्षणे दिसून येत नसली तरी त्यांच्याकडून विषाणूंचा प्रसार होऊ शकतो. ही बाब गंभीर असून, एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसीपी आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्त्वे अंतिम करावीत, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
दरम्यान, संपूर्ण देशासह राज्यातही अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यात मिशन बिगेन अंतर्गत काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आल्या आहेत. त्यातच रेस्टॉरंट्स सुरू करण्याच्या निर्णय घेतल्यास राज्याच्या तिजोरीवरील भार कमी होऊ शकतो आणि अनेक लोकांच्या हाताला कामही मिळेल. तसेच रेस्टॉरंट्सच्या मालकांनाही यामुळे दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांबरोबर आमची मुंबईत बैठक झाली असून डाइन इनची मागणी मान्य झाली आहे. लवकरच याबाबत आदेश काढला जाईल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात डाइन इन सेवा सुरू होईल. तसेच सहा महिन्यांचे उत्पादन शुल्क (एक्साइज फी) माफ केले गेले असून यामुळे हॉटेलचालक-मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
– गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलर्स असोसिएशन
मुख्यमंत्री दर महिन्याच्या 29 तारखेला पुढील महिन्यात काय-काय अनलॉक होणार याबाबत आम्हाला सूचित करतात. हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतील असून त्यांच्या सूचनांचे आम्ही पालन करू. डाइन इन, जिमला परवानगी मिळाल्यास आम्ही तशा
सूचना देऊन या गोष्टी तातडीने सुरू करू.
-विक्रम कुमार, महापालिका आयुक्त