नवी दिल्ली – ‘2 जी स्पेक्ट्रम’ गैरव्यवहार प्रकरणात माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केली आहे.
सीबीआय आणि ईडीने ही आव्हान याचिका दाखल केली असून त्यावर लवकर सुनावणी घेण्याची विनंतीही दिल्ली उच्च न्यायालयाला केली होती. या प्रकरणी 5 ऑक्टोबरपासून दैनंदिन सुनावणी केली जाईल, असे न्या. ब्रिजेश सेठी यांनी सांगितले.
सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या ‘लीव्ह टू अपील’ याचिकेवर 12 ऑक्टोबरपासून सुनावणी करण्याचे नियोजन केले गेले होते. ‘लीव्ह टू अपील’ याचिकेद्वारे सीबीआय आणि ईडीने मूळ निकालपत्रातील काही मुद्दयांनाच आव्हान दिले आहे.
आव्हान याचिकेला परवानगी मिळण्यासाठी ‘लीव्ह टू अपील’चा अर्ज न्यायालयापुढे सादर करण्यात आला आहे.