चिकुण गुनिया झाल्यामुळे आयुक्त पालिकेपासून दूर?
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून साथीच्या आजाराने धुमाकूळ घातल्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक भेदरलेला असतानाच आता या आजाराचे लोन महापालिका आयुक्तांपर्यंत पोहचले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चिकुनगुणियाची लागन झाल्यामुळे महापालिकेकडे फिरकत नसल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.
पिंपरी-चिंचवड शहरात ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या तीनही नद्यांना पूर आला होता. इंद्रायणी, मुठा आणि पवना या नद्यांमधील पूराच्या पाण्याचा निचरा वेळेत आणि योग्य पद्धतीने न झाल्यामुळे शहरात साथीच्या आजारांना सुरुवात झाली होती. महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ नियोजन न केल्यामुळे काही प्रमाणात अद्यापही शहरात साथीच्या आजाराचे रुग्ण सापडत आहेत. सप्टेंबर, आक्टोंबर महिन्या मोठ्या प्रमाणात तर नोंव्हेंबरमध्ये तुरळक प्रमाणात हे रुग्ण सापडत होते.
डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, ताप, सर्दी यासारख्या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण महापालिकेच्या विविध रुग्णालयात आजही उपचार घेत आहेत. यातील चिकुनगुणिया या साथीच्या आजाराने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे त्रस्त असल्याचे आज समोर आले. बुधवारी झालेलया स्थायी समितीच्या सभेकडे ते न फिरकल्याने ही बाब समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हर्डीकर यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही याच आजाराची लागन झाल्याचे सांगण्यात येत आहे. हर्डीकर हे सध्या त्यांच्या घरातूनच कारभार चालवित असल्याचेही सांगण्यात आले.