सागर येवले
पुणे – ‘न्यूमोनोया’ हा विषाणूजन्य आजार तसा सौम्य. मात्र, वेळीच उपचार झाले नाही तर तो जीवघेणा ठरू शकतो. विशेषत: त्यांच्या वयाच्या एक ते दीड वर्षापर्यंत बाळाची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे बालकांमध्ये हा आजार पसरतो आणि गंभीरही बनतो. त्यामुळे काळजी आणि उपचार यामुळे हा आजार पूर्ण बरा होवू शकतो.
चीनच्या ईशान्य भागासह तर अमेरिकेतही न्यूमोनिया रुग्णसंख्या वाढली आहे. तर, आपल्या देशातही आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात या आजाराबाबत जनजागृतीसह सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवून त्यांची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. विशेष लहान मुलांच्या तपासणीवर अधिक भर देण्यात येत आहे.
करोना काळात न्यूमोनियाच्या संसर्गाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे सर्दी, ताप, खोकला झाल्यावर तत्काळ उपचार घेताना दिसत आहे. मागील महिनाभरात बदलेल्या हवामानामुळे विशेषत: लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला, पोटदुखी अशा तक्रारी असल्यामुळे ओपीडी फुल्ल झाल्या आहेत.
न्यूमोनियाची लक्षणे –
– श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे
– जोरजोरात आणि कमी श्वास घेणं
– हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाण वाढणं
– ताप, अंगात थंडी भरणे आणि खूप घाम येणे
– कफ, छातीत दुखणं, खोकला,
– उलट्या होणे किंवा डायरिया
“लहान बालकांना व्हायरल इन्फेक्शन लगेच होते. न्यूमोनिया झाल्यास तो लवकर पसरतो. त्यामुळे त्याचे तत्काळ निदान होवून उपचार देणे महत्वाचे आहे. लहान मुलांमध्ये इन्फ्ल्युएन्झा ए आणि बी तसेच अॅडिनो असे व्हेरियंट आहेत.” – सागर लाड – वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ
“सध्या न्यूमोनियाचे रुग्ण वाढले असून, दर शंभरामध्ये 20 ते 25 रुग्ण न्यूमोनियाचे सापडत आहेत. पाच वर्षांखालील मुलांना न्यूमोनियाचा धोका अधिक असतो. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप लक्षणे असल्यास तत्काळ डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. संसरर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये, प्रवास टाळा, विशेष जन्मलेल्या बाळाची विशेष काळजजी घ्या. आजारी असल्यास मुलांना शाळेत पाठवू नये.” – डाॅ. रामचंद्र धोंगडे , अध्यक्ष व प्रमुख, शैशव हाॅस्पिटल
“सर्व आरोग्य संस्थामध्ये सारी व इतर श्वसन संस्थेच्या आजारांसाठी लागणारे औषधे, उपलब्ध आहेत याची खातरजमा करावी. आॅक्सिजन सिलेंडर, रुग्णवाहिका उपलब्ध असाव्यात. सर्वेक्षणावर अधिक भर द्यावा. नागरिकांमध्ये विनाकारण भीती पसरणार नाही याची दक्षता घ्यावी.” – डॉ. प्रताप सारणीकर, सहसंचालक आरोग्य विभाग, पुणे
लसीकरण महत्त्वाचे…
लसीकरणाच्या मदतीने आपण न्यूमोनियावर नियंत्रण करू शकतो. जंतूंपासून होणाऱ्या न्यूमोनियापासून बचावासाठी न्यूमोकोकल व्हॅक्सिन उपलब्ध आहे. ‘फ्लू’ विरोधातही लस उपलब्ध आहे. तर लहान मुलांना होणाऱ्या ‘हिमोफिलस इन्फंजी’ विरोधातही लस असल्यामुळे सुरक्षा मिळते, असे तज्ज्ञ सांगतात.