पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : महापालिका प्रशासनाकडून पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्यात आली असून, नालेसफाईची कामे १५ मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी संबधित विभागांना दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेने आचारसंहितेआधीच निविदा प्रक्रिया करून कामे सुरू केली असून, ही कामे वेळत संपविण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनास दिले आहे. त्यामुळे यंदातरी वेळेत नाले सफाईची होण्याची पुणेकरांना अपेक्षा आहे.
गेल्या काही वर्षांत शहरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नाले तुंबण्याचे प्रकार घडत असतात. महापालिकेकडून नाल्यांच्या साफसफाईवर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला, तरी पावसाळ्यात मात्र नाले तसेच ड्रेनेजची दुरवस्था झालेली असते. त्यामुळे नालेसफाई न करताच पैसे लाटले जात असल्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले आहेत.
यंदाही महापालिकेने नालेसफाईच्या कामाच्या काढलेल्या निविदा ४५ टक्के कमी दराने आलेल्या आहेत. त्यामुळे एवढ्या कमी दराने काम घेणारे ठेकेदार नक्की नाले साफ करणार, की महापालिकेची तिजोरी, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, महापालिका आयुक्तांनी यंदा तीन महिने आधीच बैठका घेत तत्काळ कामे पूर्ण करण्याचे, तसेच स्वत: प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणार असल्याचे बैठकीत स्पष्ट केले आहे.
३५० किलोमीटरचे नाले
शहरात २३ नाला बेसिन असून, त्याअंतर्गत सुमारे ३५० किलोमीटर लांबीचे नाले आहेत. त्यानुसार गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात नाले तुंबलेल्या, तसेच पूरस्थिती उद्भवलेल्या भागावर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जाणार आहे.
ही सफाईची कामे मुख्य खात्याकडून केली जाणार असली, तरी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून, तसेच पाच परिमंडळ उपायुक्तांकडून यावर लक्ष ठेवले जाणार आहे. याशिवाय शहरात सुमारे ६५ हजार पावसाळी वाहिन्यांची चेंबर असून, त्यांचीही सफाई केली जाणार आहे. त्यासाठीही या बैठकीत आयुक्तांनी सूचना केल्या आहेत.
शहरातील पावसाळी कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. क्षेत्रीय कार्यालये, तसेच मुख्य खात्याकडून ही कामे सुरू करण्यात आलेली असून, त्यांचाही आढावा घेण्यात आला आहे. – राजेंद्र भोसले ( महापालिका आयुक्त)