“षड्ज’, “अंतरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन : दिवंगत कलाकारांना आदरांजली वाहणार
पुणे – सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवांतर्गत यंदा देखील “षड्ज’ हा अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित लघुपट महोत्सव आणि “अंतरंग’ या संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दि. 11 ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी 10 ते 12 या वेळेत कार्यक्रम होणार असून हे दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले आहेत, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवांतर्गत होणाऱ्या प्रकाशचित्र प्रदर्शनाचे हे सलग तेरावे वर्ष असून यावर्षी “स्वर शताब्दी’ या संकल्पनेवर हे प्रदर्शन आधारलेले आहे. या माध्यमातून उस्ताद अल्लारखॉं, पंडित फिरोज दस्तूर, पंडित रविशंकर आणि डॉ. वसंतराव देशपांडे या चारही कलाकारांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. महोत्सवाच्या पाचही दिवशी मुख्य मंडपाच्या मागे असलेल्या स्वतंत्र मंडपात हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे, असे प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी सांगितले.
यंदा “षड्ज’च्या निमित्ताने दिग्दर्शक व्ही. पाकिरीसामी यांचा “पंडित रामनारायण-अ ट्रिस्ट विथ सारंगी’, एस. एन. शास्त्री दिग्दर्शित “उस्ताद अमीर खॉं’, “प्रमोद पाटी दिग्दर्शित “मोमेंट्स विथ दी माईस्ट्रो, “म्युझिक ऑफ इंडिया’, “मधू बोस दिग्दर्शित “भरतनाट्यम’ आणि उषा देशपांडे दिग्दर्शित “ख्याल’ हे लघुपट रसिकांना पाहता येणार आहेत. तर “अंतरंग’मध्ये ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया, सरोदवादक केन झुकरमन, गायक स्वामी कृपाकरानंद आणि ओडिसी नृत्यांगना रीला होता यांच्या मुलाखती होणार आहेत.
पीएमपी देणार सेवा
दरवर्षी प्रमाणे यावर्षी महोत्सवादरम्यान पीएमपीकडून सेवा देण्यात येणार आहे. महोत्सव संपल्यानंतर रसिकांना कार्यक्रम स्थळापासून धायरी (मारुती मंदिर), कोथरूड डेपो, वारजे माळवाडी आणि निगडी (भक्ती- शक्ती चौक) या भागापर्यंत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
वत्सलाबाई जोशी पुरस्कार जाहीर
भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना दरवर्षी दिला जाणारा “वत्सलाबाई जोशी पुरस्कार’ यावर्षी जयपूर घराण्याच्या ख्यातनाम गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख रुपये 51 हजार आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.