पळसदेव- उजनी जलाशयातील भिगवण, कुंभारगाव परिसरात सातत्याने दिसणारी मगर आता पळसदेव येथील मच्छीमारांना दिसली आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. उजनी जलाशयात होड्या व थर्माकॉलच्या साह्याने मासेमारी करण्यासाठी रोज सकाळी पाण्यात जाणारे मच्छिमार मगरीच्या भीतीमुळे मासेमारी करण्यासाठी गेले नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
पळसदेव येथील मच्छीमार बाळू भोई हे पत्नीसोबत मासेमारी करण्यासाठी नदीकाठी दुपारी गेले होते. त्यांनी गुळगुळीतील ओढ्यामध्ये किनाऱ्यावरून जाळी टाकत असताना अचानक नजीकच्या दाट झाडी जवळील विहिरीनजीक मगर असल्याचे त्यांना दिसली. त्यावेळी त्यांनी लांबूनच मगरीचे अक्राळ विक्राळ स्वरूप पाहून दोघा पती- पत्नीची भंबेरी उडाली. ही माहिती त्यांनी नजीकच्या मच्छीमारांना दिली.
काही मच्छिमार बाहेरच्या बाजूने पाहणी करण्यासाठी आल्यानंतर मच्छिमारांचा गोंधळ सुरू झाला. निपचित विहिरीनजीक उन्हाला पडलेली मगर पाण्यात निघून गेली. याची माहिती पत्रकारांना समजताच पत्रकारांनी माजी उपसरपंच संतोष काळे, उपसरपंच भूषण काळे, प्रताप काळे, राजू शेलार, लाला मुलाणी, बाळू भोई, अकबर सय्यद आदी मच्छिमारांना सोबत घेऊन प्रत्यक्षात घटनास्थळाची पाहणी केली.
तेव्हा विहिरीजवळ बहुतांश ठिकाणी मगरीच्या पाऊलखुणा आढळून आल्या. यावरून ही मगर 7 ते 8 फूट लांब आणि 200 ते 250 किलो वजनाची असण्याची शक्यता पाऊलखुणांवरून दिसत आहे. त्यामुळे उजनी जलाशयामध्ये मगरीचा वावर वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान, इंदापूर वनपरीक्षेत्रचे अधिकारी राहुल काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.