राजगुरूनगर- कर्नाटक व्याप्त मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या जीवावर उठण्याचीच बालिश भाषा करणाऱ्या तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कानडी नेता भीमाशंकर पाटील यांच्या पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचे दहन करीत राजगुरूनगर येथे आज (दि.29) दहन करीत पुणे-नाशिक महामार्ग अडवला.
यावेळी माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, जिल्हा संघटक गणेश सांडभोर, जिल्हा महिला संघटक विजया शिंदे,युवा सेनेचे जिल्हा चिटणीस शंकर दाते, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, माजी उपतालुका प्रमुख बाळासाहेब ताये, महेंद्र घोलप, शाखा प्रमुख कैलास गोपाळे, शहरप्रमुख सुनील टाकळकर, महिला शहर प्रमुख सुरेखा दुबे, अतुल कानडे, अर्चना सांडभोर, संगीता तनपुरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राम गावडे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक व्याप्त मराठी भाषिक पाकिस्तानात राहतात का? असा सवाल करत भाषिकवार प्रांत रचनेपासून महाराष्ट्रात येण्यासाठी कानडी अत्याचाराचा मुकाबला करीत असल्याकडे लक्ष वेधल्यानेच कर्नाटक नवनिर्माण सेनेचा नेता भीमाशंकर पाटील बिथरले असून अडगळीतील होरट्टी या माजी कानडी मंत्र्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अनुद्गार काढून वातावरण भडकविण्याचा प्रयत्न केला. त्यात कन्नड रक्षण वेदिकेकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचा निषेध म्हणून जोडे मारो आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
विजया शिंदे म्हणाल्या की, कोल्हापूर कन्नड सीमेवरील 11 गावांतील जनतेचे संरक्षण करण्याची उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. मात्र मस्तवलेल्या भीमाशंकर पाटील या माणसाने मराठी माणसावर अन्याय करून तेथे धुडगूस घातला आहे. तिथले भाजप सरकार झोपले आहे का? असा सवाल करीत भाजप सरकारचा निषेध केला. शिवसेनेशी पंगा घ्याल तर याद राखा, असा इशारा त्यांनी दिला आहे. सूत्रसंचालन गणेश सांडभोर यांनी तर सुनील टाकळकर यांनी आभार मानले.
गेल्या 64 वर्षांपासून धडपडणाऱ्या मराठी भाषिकांच्या सीमा लढ्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले होते. याचेच पोटशूळ उठल्याने रात्रीच्या अंधारात मराठी भाषिक दुकानाच्या फलकावर ही दगडफेक करून सीमा भागातील वातावरण तंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कन्नड नेत्यांनी शिवसेनेच्या आगीशी खेळू नये. अन्यथा याद राखा.
– राम गावडे, माजी जिल्हा प्रमुख, शिवसेना
कन्नड सीमेवरील मराठी बांधवांना अजूनही न्याय मिळाला नाही. त्यासाठी तेथील लोक, आणि शिवसेना प्रकाश प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. कर्नाटक व्याप्त मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या जीवावर उठण्याचीच बालिश भाषा तेथील नेते करीत असतील तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही. भीमाशंकर पाटील यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही. भविष्यात पक्ष प्रमुखांच्या बाबतीत कोणी असा प्रयत्न केला, तर जशास तसे उत्तर दिले जाईल.
– रामदास धनवटे, खेड तालुका प्रमुख, शिवसेना