नवी दिल्ली – केंद्र सरकारमधील भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल करून राष्ट्रीय भरती यंत्रणेची स्थापना करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना, वेगवगेळ्या पदांसाठी असलेल्या विविध भरती यंत्रणांच्या वेगवेगळ्या परीक्षा देण्याऐवजी केंद्रीय पातळीवरील एकच सामायिक परीक्षा द्यावी लागणार आहे.
दरवर्षी साधारणपणे 1.25 लाख सरकारी नोकऱ्यांसाठी 2.5 कोटी इच्छुक उमेदवार विविध परीक्षा देतात. वेगवेगळ्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना वेगवगेळ्या यंत्रणांचे शुल्कही भरावे लागते आणि अनेकदा परीक्षा देण्यासाठी दूरवर प्रवास देखील करावा लागतो. मात्र, आता एकाच सामाईक पात्रता परीक्षेमुळे या उमेदवारांना एकदाच ही पात्रता परीक्षा द्यावी लागेत आणि ती उत्तीर्ण झाल्यावर त्यानंतर ते यापैकी कोणत्याही एका भरती यंत्रणेकडे किंवा एकाच वेळी विविध यंत्रणांकडे उच्चस्तरीय परीक्षा देण्यासाठी अर्ज करू शकतील.
सरकारी आणि सार्वजनिक बॅंकिंग क्षेत्रातील अराजपत्रित पदांसाठी राष्ट्रीय भरती यंत्रणेमार्फत सामाईक पात्रता परीक्षा घेतली जाईल. आतापर्यंत विविध भरती यंत्रणांमार्फत होणाऱ्या विविध परीक्षांच्या ऐवजी आता दरवर्षी जाहिरात निघालेल्या सरकारी नोकऱ्यांसाठी ही एकच सामाईक पात्रता परीक्षा असेल. ही परीक्षा देशभरातील 1000 केंद्रांवर घेतली जाईल आणि देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र असेल.
या सामाईक पात्रता परीक्षेत मिळवलेले गुण तीन वर्षांसाठी ग्राह्य धरले जातील आणि ही परीक्षा कितीही वेळा देता येईल. मात्र, त्यासाठीच्या कमाल वयोमर्यादेची अट लागू राहील. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी सध्या असलेल्या वयोमर्यादेबाबतच्या शिथिलता पुढेही कायम राहतील.
12 भाषांमधून परीक्षा देण्याची सोय…
ही सामाईक पात्रता परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाईल. पदवी, 12 वी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण अशा पातळ्यांसाठी वेगवेगळ्या सामाईक पात्रता परीक्षा असतील, यामुळे विविध पातळ्यांवर वेगवेगळी भरती प्रक्रिया करता येईल. याआधी केंद्र सरकारमधील पदभरतीच्या सगळ्या परीक्षा केवळ इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषेतून होत असत. मात्र, ही सामाईक पात्रता परीक्षा प्रमुख 12 भारतीय भाषांमध्ये घेतली जाईल. या सामाईक पात्रता परीक्षेअंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती बोर्ड आणि बॅंकिंग कर्मचारी निवड संस्था यांचा समावेश आहे. पुढे टप्प्याटप्याने आणखी यंत्रणाही यात समाविष्ट केल्या जातील.