नवी दिल्ली – नॅशनल हेरॉल्ड या कॉंग्रेसच्या मुखपत्राच्या एका जुन्या प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडी मार्फत नोटीस पाठवण्यात आली आहे. या अनुषंगाने राहुल गांधी यांना 2 जुनला तर सोनिया गांधी यांना 8 जुनला चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने जारी केला आहे. ईडीने ही नोटीस मनी लॉड्रिंग कलमान्वये जारी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
सन 2015 चा हा मामला असून तो बंद करण्यात आला होता. पण यानिमीत्ताने तो पुन्हा सुरू करून कॉंग्रेसवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केला आहे. ते म्हणाले की कॉंग्रेसच्या नॅशनल हेरॉल्ड नावाच्या मुखपत्राच्या एका व्यवहाराशी संबंधीत हे प्रकरण आहे. या प्रकरणाचा आधीच तपास झाला आहे, पण त्यात सरकारला काहीही सापडलेले नाही. सुडाच्या भावनेतून सरकार अंध झाले आहे असे ते म्हणाले.
या विषयात कोठेही पैशांची देवघव झालेली नाही. यात केवळ इक्विटी कनर्व्हजन किंवा कर्ज बदलाचा प्रकार झाला आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की, 1937 साली तत्कालिन ब्रिटीश सरकारला या देशातून घालवून देण्यासाठी नॅशनल हेरॉल्डे हे मुखपत्र कॉंग्रेसने काढले आहे, ज्याचे प्रणेते महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, आचार्य नरेंद्र देव, रफी अहमद किडवाई यांच्या सारखे महान नेते होते.
या मुखपत्राला तत्कालिन ब्रिटीश सरकारही इतके घाबरले होते की त्यांनी सन 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाच्यावेळी या मुखपत्रावर बंदी घातली होती. ही बंदी 1945 पर्यंत सुरू होती. आपले स्वातंत्र्य धोक्यात आहे पुर्ण शक्तीने त्याचे रक्षण करा असा या पत्राचा मुख्य संदेश त्यावेळी असायचा. आज पुन्हा इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या विचारधारेच्या विरोधात हाच संदेश देण्याची वेळ आली आहे असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. ना ब्रिटीश सरकार नॅशनल हेरॉल्डचा आवाज दाबू शकले ना आता या सरकारला हे काम करता येणे शक्य आहे.आम्ही या दडपशाहीच्या विरोधात छातीठोकपणे उभे राहून लढू असा निर्धारही सुर्जेवाला यांनी व्यक्त केला आहे.