पुणे : एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून एसटीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्व प्रकारचे प्रयत्न करेल. त्यासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पण हा एसटीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. एसटीच्या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. रस्त्यात अडचणी येतात, खड्डे असतात मात्र मार्ग काढत एसटीचा प्रवास सुरू आहे. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. ही प्रत्येक गावातील माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
एसटीचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. कोरोनाच्या काळात एसटीने आगळेवेगळे काम केले आहे. टाळेबंदीमध्ये साडेसात लाख कामगारांना पराराज्याच्या सीमेवर जाण्यासाठी मोलाचे काम एसटी कर्मचाऱ्यांनी केले. कोरोनानंतर एसटी पूर्वपदावर येत आहे. एसटीचा तोटा कमी करून फायदा कसा होईल याकडे लक्ष दिले जात आहे. त्यासाठी मालवाहतूकीकडेही अधिक लक्ष देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
एसटी बदलांना सामोरे जात असून आज पहिली एसटी इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ बस सुरू केली आहे. कोरोना संकटाचा काळ विसरून एसटीच्या वैभवासाठी नव्या दमाने सुरूवात करण्याचे आवाहन मंत्री परब यांनी केले. प्रवाशांची सेवा, कर्मचाऱ्यांची काळजी आणि आणि आपल्या व्यवसायिक कर्तव्यावर प्रेम अशा त्रिसूत्री नुसार काम करूया, असेही ते म्हणाले.