आता विक्रम पुस्तकात नोंद
पॅरिस : आगपेटीच्या काड्यांपासून बनवण्यात आलेल्या आयफेल टॉवरच्या सर्वात उंच प्रतिकृतीची दखल अखेर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड घेतली आहे. काही दिवसापूर्वीच ह्या विक्रमाला गिनीज बुकने नकार दिला होता. पण अखेर हा विक्रम असल्याचे गिनीज बुकने मान्य केले. विक्रम म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे.
रिचर्ड फ्लॉड नावाच्या एका व्यक्तीने 7.19 मीटर म्हणजे जवळजवळ 23 फूट उंचीचा आयफेल टॉवर बनवला होता. पण निकषात बसत नसल्याच्या कारणावरून गिनिज बुकने त्याच्या विक्रमाची नोंद घेतली नव्हती. रिचर्डने गेल्या आठ वर्षांच्या कालावधीमध्ये 7,06,900 काड्यांचा वापर करून आणि 23 किलो पेक्षा जास्त डिंकाचा वापर करून ही प्रतिकृती तयार केली होती.
आगपेटीच्या काड्यांच्या गुलाकडचा भाग कट करून त्याने सर्वप्रथम हे काम सुरू केले होते पण हे काम अवघड असल्याचे लक्षात येतात. त्याने आगपेटी बनवणाऱ्या एका कंपनीकडून गुल नसणाऱ्या काड्या विकत घेतल्या आणि नंतर ह्या आयफेल टॉवरची उभारणी केली. पण याच कारणामुळे प्रथम गिनीज बुकने त्याच्या विक्रमाची दखल घेतली नव्हती.
गिनीज बुकचे अधिकारी मार्क मेकॅनली यांनी रिचर्ड फ्लॉड्चे अभिनंदन केले असून प्रारंभी त्याच्या विक्रमाची दखल न घेतल्याबद्दल खेदही व्यक्त केला आहे. जुलैमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेमध्ये रिचर्डने तयार केलेली ही आयफेल टॉवरची प्रतिकृती प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.