“महाराष्ट्रात अजून अनलॉक केलेले नाही” – वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर राज्य सरकारचे स्पष्टीकरण

मुंबई – राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेत, राज्यातील लॉकडाउनच्या निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली होती. यावेळी त्यांनी, राज्यात पाच टप्प्त्यांमध्ये अनलॉक करण्यात येईल व त्यातील जिल्ह्यांची वर्गवारी कशी असेल हे देखील सांगितले होते. मात्र आता राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना, असा निर्णय झाला नसल्याचा निर्वाळा केला आहे.

याबाबत माहिती देताना राज्याच्या आरोग्य  मंत्रालयाने, ‘करोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत’ असे स्पष्ट केले.

प्रस्ताव विचाराधीन!

अनलॉकबाबत अधिक माहिती देताना, “अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल” असे देखील सांगण्यात आले.

काय म्हणाले होते वडेट्टीवार? 

महाराष्ट्रात अनलॉक करणार असल्याची घोषणा करताना वडेट्टीवार यांनी, “सध्याच्या परिस्थितीत पाच टप्प्यांमध्ये अनलॉक केलं जाणार आहे. या पाच टप्प्यांमध्ये ज्या जिल्ह्यात पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल. यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होतील. जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण 43 भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे” अशी माहिती दिली होती.

Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यांमध्ये होणार अनलाॅक; काही जिल्ह्यांत उद्यापासून…

वडेट्टीवारांनी सांगितलेले राज्यातील अनलॉकचे पाच टप्पे 

पहिला टप्पा – सर्व निर्बंध उठवणार
दुसरा टप्पा – मर्यादित स्वरूपात निर्बंध उठवणार
तिसरा टप्पा – काही निर्बंधांसह अनलॉक
चौथा टप्पा – निर्बंध कायम
पाचवा टप्पा – रेड झोन. कडक लॉकडाऊन
  

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.