इस्लामपूर (प्रतिनिधी) – करोनाग्रस्तांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी “तो” सतत रस्त्यावर होता. करोना रुग्णांना घरातून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी पुढे असायचा. अनेकदा करोना रुग्णांचे नातेवाईक मागे असायचे पण सुहास जंगम या उमदा तरुण अग्रभागी होता. सुहास प्रकाश हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरच्या रुग्णवाहिकेचा चालक होता. त्याच्या दुर्देेवी मृत्यूने हाॅस्पिटलमधील डाॅक्टर्स, स्टाफने हळहळ व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली.
इस्लामपूर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मधील सुहास दिनकर जंगम (वय ४२ रा.करंजवडे) हा योध्दा मृत्युशी लढताना हरला. रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत असताना अनेकांना जीवदान दिले होते.
सांगली रस्त्यावर प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. स्वत: चा जीव धोक्यात घालुन हजारो कर्मचारी रुग्णसेवा देत आहेत. रुग्णांना मृत्युच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी असंख्य हात राबत आहेत. अनेकांना जीवदान देण्यात हाॅस्पिटल मधील डाॅक्टर्स व सहकारी स्टाफचे मोठे योगदान आहे. सेवा देताना सुहास दिनकर जंगम सारखा चौथा योध्दा करोनाची लागण होऊन उपचार घेत असताना मृत झाला.
सुहास जंगम हे गेल्या अनेक वर्षापासुन प्रकाश हाॅस्पिटल मध्ये रुग्णवाहीकेवर चालक म्हणून काम करत होते. त्यांची तब्बेत साथ देत नसल्याने काही दिवस सुट्टीवर होते. यातच त्यांना कोरानाची लागण झाली. उपचारासाठी प्रकाश हाॅस्पिटमध्येच दाखल करण्यात आले होते. काही दिवसाच्या उपचाराच्या प्रयत्नानंतर अपयश आले अन् त्यांचा मृत्यु झाला.
एकीकडे प्रामाणिक काम करुन दुसर्याचा जीव वाचवता वाचवता सेवक वर्गाला जीव गमवावा लागत आहे.एकीकडे राजकीय कुरुघोडीतुन विरोधक फसवणूक व ॲट्राॅसिटी सारखे खोटे दाखल करण्यात आनंद मानत आहेत. यामध्ये प्रशासन ही डोळ्यावर पट्टीबांधुन व हाताची घडी घालून गप्प आहे व एकीकडे पोलिस चौकशीच्या निमित्ताने कर्मचार्यांना बोलावणे धाडत आहेत. यामुळे डाॅक्टर्स व सहकारी स्टाफ खचला असल्याची भावना प्रकाश कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली.