पॅरिस : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीसाठी रशियात दाखल झाले आहेत. एका खासगी बुलेटप्रूफ ट्रेनद्वारे त्यांनी रशियामध्ये एंट्री केल्याने त्यांच्या या भेटीची जगभरात चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, त्यांच्या या भेटीने जगातील महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला धडकी भरली आहे.कारण दोन्ही बलाढ्य देशांमध्ये शस्त्रास्त्रांसंबंधी करार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियाने सोमवारी एका अहवालात भेटीची पुष्टी केली, पुढील काही दिवसांत किम पुतीन यांच्याशी भेटण्याची अपेक्षा आहे. “आमचे प्रिय कॉम्रेड किम जोंग उन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून रशियाला भेट देणार आहेत. भेटीदरम्यान ते पुतिन यांची भेट घेतील आणि शिखर परिषद आयोजित करतील,” असे कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने म्हटले आहे.
North Korean leader Kim Jong Un has arrived in Russia, Japanese media reported, for what the Kremlin said would be a comprehensive discussion with President Vladimir Putin amid warnings from Washington they should not agree on an arms deal https://t.co/Okxozo75WE pic.twitter.com/g2DDlfRGtk
— Reuters (@Reuters) September 12, 2023
उत्तर कोरियाच्या नेत्याला घेऊन जाणारी बुलेट-प्रूफ ट्रेन रविवारी रात्री प्योंगयांगहून निघाली आहे. यावेळी किम जोंग-उन यांच्यासमवेत देशातील काही मोठे शस्त्रास्त्र निर्मिती करणारे उद्योगपती व उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्रीही होते. ही रेल्वे सोमवारी रशियातील खासान रेल्वे स्थानकात दाखल झाली. दक्षिण कोरियाच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील घनिष्ठ संबंधांचा “अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मोठा धोरणात्मक परिणाम” होईल असा जागतिक स्तरावरील तज्ज्ञानी म्हटले आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असणाऱ्या युद्धात आता रशियाला शास्त्रांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे उत्तर कोरियाकडून रशिया शस्त्र खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रास्त्र खरेदीचा करार होणार असल्याने यापूर्वीच अमेरिकेने अशी कोणतीही चर्चा रशियाने करू नये असे म्हटले होते. मात्र अमेरिकेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत रशिया उत्तर कोरियाकडून शस्त्र खरेदी करणार आहे. या सर्व परिस्थितीचा आता जागतिक स्तरावर मोठा परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, उत्तर कोरियाचे नेते किम-जोंग-उन यांनी १२ वर्षात केवळ ७ परदेश दौरे केला आहेत. त्यातील ४ दौरे तर भारताचा शेजारी चीनचे केले आहेत. त्यामुळे या दौऱ्याची जागतिक स्तरावर विशेष चर्चा सुरु झाली आहे.