मुंबई – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय शो मागील काही वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. या शोमधील सर्वच कलाकरांच्या विनोदी शैलीचे कौतुक केले जाते. यातील सर्वांचा लाडका गौरव मोरे लवकरच नवीन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘परिनिर्वाण’ चित्रपटामध्ये गौरव मोरे महत्वाची भूमिका साकारणार आहे. सोशल मीडियावर पोस्टद्वारे त्याने ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘परिनिर्वाण’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर गौरव देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. गौरव श्यामरावची भूमिका साकारणार असून त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाच्या स्क्रिप्टचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्याने कॅप्शनमध्ये ‘एक नवीन सुरुवात’ , असं लिहिलं आहे. त्याच्या पोस्टनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
View this post on Instagram
अनेकांनी गौरव या चित्रपटात दिसणार असल्याने त्याचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘नशीब काढलं भावा, बाबासाहेब यांच्यावर आधारित चित्रपटात भूमिका घेत आहेस, आम्ही नक्की बघायला येणार…’ याशिवाय समीर चौघुले यांनी देखील कमेंट करत लिहिले की, ‘गौऱ्या तुला मनापासून शुभेच्छा..हा चित्रपट भरघोस यश मिळवेल मित्रा….आम्हाला तुझा अभिमान आहे.’
दरम्यान, याआधी प्रसाद ओकने ‘धर्मवीर’ या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता तो ‘परिनिर्वाण’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.