प्यॉंगयॉंग: लष्कराची ताकद वाढवण्यासाठी उत्तर कोरियाने केलेल्या पहिल्या हेरगिरीच्या उपग्रहाचे प्रक्षेपण नुकतेच अयशस्वी झाले. प्रतिस्पर्धी दक्षिण कोरिया तसेच अमेरिकेच्या लष्करी सरावांवर नजर ठेवण्यासाठी त्यांनी हा उपग्रह सोडण्याचे नियोजन केले होते. या अयशस्वी प्रक्षेपण संदर्भात उत्तर कोरियाने आपल्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे. या अपयशामुळे उत्तर कोरियाची जगभर नाचक्की झाल्याने सरकार संबंधितांविरुद्ध कडक पावले उचलणार आहे.
उत्तर कोरियाने 31 मे रोजी आपला पहिला लष्करी गुप्तचर उपग्रह कक्षेत ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु उपग्रह घेऊन जाणारे रॉकेट पिवळ्या समुद्रात कोसळले. यामागे इंजिनातील बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर कोरियाने लवकरात लवकर पुन्हा उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याचे सांगितले होते.
कोरियाच्या वर्कर्स पार्टीच्या केंद्रीय समितीच्या बैठकीच्या अहवालात सत्ताधारी पक्षाने बेजबाबदारपणे उपग्रह प्रक्षेपणाची तयारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. यासोबतच या लोकांनीही चौकशीची मागणी केली आहे. याआधी प्योंगयांगने या भागात अमेरिकेच्या वाढत्या लष्करी उपस्थितीवर नजर ठेवण्यासाठी हा उपग्रह आवश्यक असल्याचे म्हटले होते.
लष्करी गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या योजनेचा अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानने निषेध केला होता. अण्वस्त्रधारी देशाला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्याही चाचण्या घेण्यापासून प्रतिबंधित करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे ते उल्लंघन करते असे त्यांचे म्हणणे आहे.