पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रीय समित्यांमार्फत रस्ते, चौक व सार्वजनिक मालमत्तांना दिलेल्या नावांमध्ये बदल करून नवीन नावे दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिका मालमत्तांच्या नामकरणाची नियमावली प्रशासनाने तयार केली आहे. त्याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिला असून, त्यानुसार कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
10 फेब्रुवारी 2021 रोजी उपमहापौर आणि महापालिका अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करुन अहवाल सादर करण्याबाबत नमूद केले होते. त्याअनुषंगाने समितीने शिफारसी केल्या आहेत. 21 डिसेंबर 2021 ला नामकरणाबाबतच्या विषयावर महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात समितीच्या शिफारशींनुसार कार्यवाही करण्याचे ठरले.
त्यानुसार महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नामकरणाबाबत कार्यवाही करताना कार्यपद्धती निश्चित केली आहे. नामकरणाबाबतचे सर्व प्रस्ताव दीर्घ मुदतीचे असावेत. काही वास्तू, मुख्य रस्ते, उद्याने किंवा विशेष प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम व्यक्तींचे नाव देण्याबाबत विचार करावा.
रुग्णालये, दवाखाने किंवा इतर इमारतींना दहा वर्षे अथवा त्यापुढे स्वखर्चाने चालविण्यास आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर केल्यास आयुक्त, स्थायी समिती आणि महासभेच्या मान्यतेने त्या संस्थेच्या विनंतीनुसार नामकरणाचा विचार केला जाणार आहे.
अशी आहे कार्यपद्धती
क्षेत्रीय समिती अथवा महापालिका ठरावाने दिलेल्या नावांमध्ये बदल करू नये. क्रीडा, वैद्यकीय शिक्षणविषयक वास्तूंना त्या-त्या क्षेत्रात योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त केलेल्यांची नावे द्यावीत. महापालिकेच्या सांस्कृतिक भवन, नाट्यगृह, कलादालन तसेच इतर वास्तूंना त्या-त्या क्षेत्रांशी संबंधितांची नावे द्यावीत.
एखाद्या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू नसल्यास स्थानिक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांचीही शिफारस करता येईल. ज्यांनी कोणत्याही प्रकल्पास विनामोबदला जागा दिली असल्यास त्यांच्या सूचना अथवा मागणीप्रमाणे प्रकल्पाच्या नावाबाबत विचार करता येईल.
शहरातील रस्ते, चौक, पूल, बसथांबे यांना राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक सेवा केलेल्या व्यक्ती, महापुरुष, साधू, संत, राजे महाराजे यांची नावे द्यावीत. पण, एकच नाव दोन ठिकाणी नसावे. मंडई, व्यापारी संकुल, अंतर्गत रस्ते, चौक यांना सामाजिक कार्यात योगदान असलेल्या व्यक्तींचे नाव द्यावे. कोणत्याही मालमत्तांचे धार्मिक, जातीय तेढ निर्माण होईल असे नामकरण करण्यात येऊ नये.