नवी दिल्ली – सर्व सामान्यांचं आर्थिक बजेट भलेही बिघडलेलं असेल, पण काही लोकांचं बजेट नेहमीच सदाबहार असतं. मात्र अशी लोक सध्या आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत. नोएडामध्ये यूपी कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी आर.एन. सिंह यांच्या घरात तीन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे.
आर.एन. सिंह यांचा मुलगा घराच्या बेसमेंटमध्ये एक खासगी लॉकर फर्म चालवतो. हे लॉकर भाड्याने दिले जातात. आयकर विभागाने मारलेल्या छाप्यात या लॉकरमधून कोट्यवधी रुपये जप्त कऱण्यात आले आहेत. मात्र अद्याप हा पैसा कोणाचा आहे, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या बेसमेंटमध्ये 650 लॉकर आढळून आले.
आरएन सिंग हे यूपीचे डीजी प्रोसिक्युशन होते. त्यांनी म्हटलं की, ही फर्म त्यांचा मुलगा चालवतो, कमिशनच्या आधारे लॉकर भाड्याने देतो, त्यांच्याकडे देखील 2 लॉकर आहेत. मात्र त्यात काहीही आढळून आलं नाही.
छापेमारीच्या वेळी माजी आयपीएस आरएन सिंह म्हणाले, ‘मी माझ्या गावात होतो, मला माहिती मिळाली की आयकर पथक तपासासाठी घरी आले आहे, म्हणून मी लगेच घरी पोहोचलो. जवळपास सर्व लॉकर्स तपासले गेले आहेत, तपासात जे सापडलं त्याची सर्व माहिती आमच्याकडे आहे. घरातील काही दागिने टीमला सापडले आहेत, आमच्याकडे त्यासंदर्भातील संपूर्ण कागदपत्रे असल्याचा दावाही आर.एन. सिंह यांनी केला.