खासगीकरण नाही, उत्पन्न वाढीवर भर : परिवहन मंत्री

अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत विविध पर्यायांवर करण्यात आली चर्चा

पिंपरी  -करोना महामारीत महाराष्ट्र परिवहन महामंडळाला (एसटी) मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण न करता एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, उत्पन्नाचे मार्ग वाढवत, मार्गांचे सुसूत्रीकरण करणे, काही गाड्यांच्या फेऱ्यांचे एकत्रीकरण करणे, अशा काही उपाययोजनांद्वारे एसटीच्या उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरू आहेत. 

करोना परिस्थितीनुसार एसटीच्या प्रवासी संख्यांचा निर्णय ज्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली.

ते वाकडेवाडी येथील एसटी स्थानक आणि दापोडी येथील एसटीच्या कार्यशाळेला भेट दिल्यानंतर परिवहन मंत्री परब यांनी भोसरी येथील सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) येथे भेट दिली.

या ठिकाणी परब यांनी एसटीच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत एसटीच्या उत्पन्न वाढीसंदर्भातील विविध पर्यायांवर चर्चा केली. परब म्हणाले की, करोनामुळे गेल्या दीड वर्षांत एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काहीकाळ तर, एसटीचे उत्पन्न शून्यावर आले होते. अजूनही एसटीची सेवा पूर्णपणे चालू होण्यासाठी दोन ते तीन महिने लागू शकतात. ज्या त्या जिल्ह्यांत करोनाची परिस्थिती बघून प्रवासी क्षमता वाढविण्याचा निर्णय संबंधित जिल्हाधिकारी घेऊ शकतात.

एसटी ही महाराष्ट्राची ओळख आहे. ते गरिबांचे वाहन आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी एसटीचे खासगीकरण होणार नाही, असे सांगत परिवहन मंत्री परब यांनी खासगीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान, एसटी कर्मचारी यांच्या उशिरा होणाऱ्या पगाराबाबत विचारले असता महाराष्ट्र सरकारने एसटीला 600 कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे पगाराची काही अडचण येणार नसल्याचे परब यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.