फायझर, मॉडर्नाच्या लसीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम?; संशोधनातून ‘ही’ माहिती उघड

नवी दिल्ली : जगाला वेठीस धरणाऱ्या करोनाने सर्वांना हैराण करून सोडले आहे. करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जगभरात लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचा बऱ्याच देशांना फायदा देखील झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी फायझर, मॉडर्ना यांनी विकसित केलेली करोना लस घेतल्यास प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता एका संशोधनामुळे निर्माण झाली आहे.
‘जामा’ या नियताकालिकेत प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, १८ ते ५० या वयोगटातील ४५ निरोगी व्यक्तींना या संशोधनात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांना फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाच्या एमआरएनए कोविड लस देण्यात आली होती. या संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींना यापूर्वीदेखील प्रजननाबाबत कोणतीही समस्या नव्हती.

लस टोचण्यापूर्वी संशोधनात ९० दिवस आधी करोनाग्रस्त किंवा लक्षणं असलेल्या लोकांचा समावेश करण्यात आला नाही. संशोधनात सहभागी झालेल्या पुरुषांना करोना लसीचा पहिला डोस देण्याआधी वीर्याचे नमुने घेण्यात आले. तर, लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ७० दिवसांनी पुन्हा वीर्याचे नमुने घेण्यात आले होते. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार प्रशिक्षित तज्ज्ञांनी विविध मानकांवर शुक्राणूंची तपासणी केली.

या दोन्ही वेळेस वीर्यातील शुक्राणूंच्या संख्येत फरक नसल्याचे दिसून आले.संशोधनात सहभागी असलेल्या अमेरिकेतील मियामी विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याच्या भीतीमुळे अनेकजण लस घेण्यास घाबरत आहेत. त्यामुळे या शंका दूर करण्याची अधिक आवश्यकता आहे.

अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये करोना लसींविरोधात अफवा सुरू होत्या. फायझर, मॉडर्नाची लस घेतल्यानंतर शुक्राणूंची संख्या कमी होत असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यामुळे अनेकजणांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र, आता करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर शुक्राणूंच्या संख्येवर कोणताही परिणाम होत नसल्याचे संशोधनात समोर आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.