भारती विद्यापीठ वाहतूक विभागाकडेही जागा नाही
आंबेगाव बुद्रुक – आंबेगाव, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, कात्रज, धनकवडी या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने लोकसंख्ये बरोबरच वाहनांची संख्याही वाढली आहे. यातून वाहतूक कोंडी आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. नागरिकांना शिस्त लावताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक होत आहे; परंतु वाहतूक पोलीसच नियम मोडीत असतील तर त्यांना कोण शिस्त लावणार? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या कारभाराबाबत अधिक माहिती अशी की, आंबेगाव बुद्रुक परिसर सर्व सुखसोयी युक्त असल्याने या कारणातून येथे नागरिकांची मोठी गर्दी असते. परंतु अरुंद रस्ते व छोटे चौक, वळणाचे रस्ते यामुळे सर्वच चौकांत वाहतूक कोंडी होते. यावर पर्याय म्हणून येथे अनेक ठिकाणी समांतर पार्किंग व्यवस्था आहे. परंतु अपुऱ्या जागेमुळे चालक जमेल त्या ठिकाणी वाहने उभी करतात.
“नो पार्किंग’मध्ये वाहन लावल्याने पोलीस कारवई करून चौकीला वाहन घेऊन जातात. विशेष म्हणजे नो पार्किंची सर्वाधिक कारवाई या परिसरात केली जाते. परंतु नो पार्किंग मधून उचललेली वाहने वाहतूक विभागाकडे जागा नसल्यामुळे सातारा रस्त्यावरील काळूबाई मंदिरासमोर “नो पार्किंग’मध्येच लावण्याची वेळ वाहतूक विभागावर आली आहे. त्यामुळे पोलीस नियम मोडीत असतील तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
महानगरपालिकेने वाहतूक विभागाला जागा उपलब्ध करून दिली तर नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करून वाहतूक कोंडी सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू.
– विष्णू पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ वाहतूक विभाग