स्मृती मंधनाचा 18 जुलै 1996 ला मुंबईमध्ये जन्म झाला. तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीमध्ये झाले. तिच्या क्रिकेटची सुरुवात अगदी लहानपणीच झाली. तिचे वडील श्रीनिवास क्रिकेटपटू होते. ते सांगलीच्या संघातर्फे जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये सहभागी व्हायचे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
पुढे त्यांनी आपल्या मुलाला – श्रवणला क्रिकेट शिकवायला सुरुवात केली. भावाला क्रिकेट शिकवताना छोटी स्मृती बारीक निरिक्षण करायची आणि तसे खेळायचा प्रयत्न करायची. ‘मी 7-8 वर्षांची असताना माझं नाव पेपरमध्ये छापून यावं अशी माझी इच्छा होती म्हणून मी क्रिकेट खेळणं सुरु केलं.’ असं स्मृती खुल्या दिलाने कबूल करते!
हळूहळू तिच्यातील चमक पाहून वडीलांनी तिलाही क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि स्मृतीच्या क्रिकेट ट्रेनिंगची सुरुवात घरच्या घरीच झाली. यापुढच्या तिच्या क्रिकेटमधील कसबाला सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पुढे पैलू पाडले गेले.
स्मृती 9 वर्षांची असताना तिला महाराष्ट्राच्या 15 वर्षांखालील संघात खेळण्याची संधी मिळाली तर 11 व्या वर्षी 19 वर्षांखालील संघात स्थान मिळाले. ऑक्टोबर 2013 मध्ये 19 वर्षाखालील महाराष्ट्र संघातर्फे खेळताना तिने गुजरातविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 150 चेंडूत नाबाद 224 धावा काढल्या आणि एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली! 2016 मध्ये इंडीया रेड संघाला वुमेन्स चॅलेंजर ट्रॉफी मिळवून देण्यात तिचा महत्वाचा वाटा होता. यावेळी तिने तीन अर्धशतके फटकावली. तिच्या उत्कृष्ट फलांदाजीच्या जोरावर 2016 मध्ये तिला आयसीसी महिला संघात स्थान मिळाले,असे स्थान मिळवणारी ती एकमेव भारतीय महिला होती. यानंतर ती वुमेन्स बिग बॅश लीग व कीया सुपर लीग कडून देखील खेळली.
भारतीय क्रिकेटमधील तिची घोडदौड सुरुच राहिली. 2017 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीज विरूद्ध तडाखेबाज शतक फटकावलं. टी-ट्वेन्टी सामन्यात वेगवान अर्धशतक काढण्याचा विक्रम स्मृतीच्या नावावर आहे. ही कामगिरी तिने केवळ 22 चेंडूंमध्ये केली.
स्मृती मंधनाच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान दोन हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम देखील आहे. तिने कारकिर्दीतील 51 व्या खेळीतच ही कामगिरी केली. अशी कामगिरी केलेली ती तिसरी महिला क्रिकेट ठरली, तर भारतीय क्रिकेटमधील दुसरीच खेळाडू ठरली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान दोन हजार धावा 38 खेळीत करण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे.
तिने आतापर्यंत 51 एकदिवसीय, 74 टी-ट्वेन्टी तर 2 कसोटी सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावे 2025, टी-20 मध्ये 1705 तर कसोटीमध्ये 81 धावा आहेत. एकदिवसीय सामन्यात 4 शतके आणि 17 अर्धशतके झळकावली आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये तिने 12 अर्धशतके झळकावली आहेत.
दमदार सलामीवीर म्हणून ख्याती असलेल्या स्मृतीचा जून 2018 मध्ये बीसीसीआयने तिचा ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू’ म्हणून गौरव केला तर डिसेंबर 2018 मध्ये आयसीसी ने देखील त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून स्मृतीला नावाजले. तसेच 2019 मध्ये स्मृतीला विस्डेन इंडियाचा सर्वोत्कष्ट महिला क्रिकेटपटू पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. २०१८-१९ या कालावधीत सर्वोत्तम कामगिरी केल्याबदल स्मृतीला सिएट क्रिकेट रेटिंग पुरस्कारांमध्ये आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. तसेच क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते जुलै 2019 मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये स्थित भारती. क्रीडा प्राधिकरणाच्या मुख्यालयात आयोजित शानदार कार्यक्रमात तिला वर्ष 2018 चा अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषकात ती भारतीय संघाची अनुभवी व महत्वाची फलंदाज म्हणून कामगिरी बजावत आहे. भारतीय संघाने अ गटात अव्वल राहत स्पर्धेची अंतिम फेरी देखील गाठली आहे. स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूध्दचा पहिला सामना भारताने 17 धावांनी जिंकला. या पहिल्या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिसने स्मृती मंधानाची विराट कोहलीसोबत तुलना केली. “स्मृती महिला क्रिकेटची विराट कोहली आहे. सर व्हिव रिचर्ड्स यांनी आपल्या अनोख्या शैलीने क्रिकेटमध्ये काही बदल घडवून आणले…स्मृतीनेही आपल्या खेळीने महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला आहे.” समालोचनादरम्यान स्टायरिसने स्मृती मंधानाचं कौतुक केलं.
डावखुरी फलंदाज असणारी स्मृती बाकीची सगळी कामं मात्र उजव्या हाताने करते – अगदी गोलांदाजी सुद्धा! आपल्या पालकांचा आणि भावाचा आपल्या यशात मोठा वाटा असल्याचे स्मृती आवर्जून सांगते. वडील तिच्या क्रिकेटच्या दौऱ्यांची जबाबदारी पहातात, आई तिचे कपडे व आहार याकडे लक्ष देते तर भाऊ अजूनही ती नेटमध्ये प्रॅक्टीस करताना तिला गोलंदाजी करतो! अशा या स्मृतीने आपल्या खेळामुळे महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली आहे!